ट्रॉली कालव्यात पडून सात ऊसतोड मजूर बेपत्ता

By Admin | Updated: February 19, 2015 01:54 IST2015-02-19T01:54:14+5:302015-02-19T01:54:14+5:30

सोलापूर-पुणे महामार्गावरील उजनी मुख्य कालव्याच्या पुलावरून ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने सात ऊसतोड मजूर बेपत्ता झाले आहेत़ ही घटना बुधवारी पहाटे २़३०च्या सुमारास घडली़

Seven unused laborers missing in trolley canal | ट्रॉली कालव्यात पडून सात ऊसतोड मजूर बेपत्ता

ट्रॉली कालव्यात पडून सात ऊसतोड मजूर बेपत्ता

डी. एस. गायकवाड ल्ल टेंभुर्णी
सोलापूर-पुणे महामार्गावरील उजनी मुख्य कालव्याच्या पुलावरून ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने सात ऊसतोड मजूर बेपत्ता झाले आहेत़ ही घटना बुधवारी पहाटे २़३०च्या सुमारास घडली़ शेतकऱ्याच्या नकळत ऊसतोडीचे पैसे घेऊन नगर जिल्ह्यातील हे मजूर रातोरात गाव सोडून जात होते.
ऊसतोड करणारे मजूर पळून गेल्याची माहिती शेतकरी बाळासाहेब सोपान चंदनकर यांना मिळताच त्यांनी आपला भाऊ सहदेव यांच्यासह जीपमधून या मजुरांचा पाठलाग केला. भीमानगर येथे त्यांना हा ट्रॅक्टर दिसला़ तेव्हा त्यांनी चालकास ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले. परंतु ट्रॅक्टर न थांबता ऊसतोड मजूर घेऊन तसाच पुढे निघाला़ यावेळी चंदनकर बंधूंनी त्यांच्यावर दगडफेक केली़
शेतकऱ्याला चुकविण्याच्या नादात, घाबरलेल्या चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पुणे-सोलापूर महामार्गावरील उजनीच्या कालव्यात पडला़ उजनी कालव्यात सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने तो पूर्णक्षमतेने भरून वाहत आहे़ रात्रीची वेळ असल्याने ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही़
या दुर्घटनेमध्ये ट्रॅक्टरमधील चालक बाळासाहेब जगन्नाथ गुंजाळ (३०), रेखा अंबादास गुंजाळ (३०), कविता बाळासाहेब गुंजाळ (२५),
हिरा राजू मोरे (२५), अर्जुन राजू
मोरे (६), कार्तिक राजू मोरे
(४), शुभम बाळासाहेब गुंजाळ (५)
हे सर्व वाहून गेल्याचे पोलिसांनी सांगितले़ अंबादास सीताराम
गुंजाळ (३९) व राजू सर्जेराव मोरे
(३०) हे दोघे पोहून बाहेर निघाले़ बुधवारी सकाळी १०़१५ वाजता ते टेंभुर्णी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला़
कालव्यातील प्रवाह थांबविण्याची विनंती पोलीस प्रशासनाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली़ मात्र संबंधितांनी त्यांची दखल न घेता तांत्रिक अडचण सांगत पाणीप्रवाह सुरूच ठेवल्याने तपासाला अडसर निर्माण होत आहे़ (वार्ताहर)

पोलिसांची धावपळ : घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांचे पथक क्रेन, रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले़ तपास यंत्रणा वेगाने कामाला लागली़ क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर व ट्रॉली बाहेर काढण्यात आली, परंतु त्यामध्ये एकही व्यक्ती आढळली नाही़

चंदनकर बंधूंवर गुन्हा दाखल
गावाकडे निघालेल्या ऊसतोड मजुरांचा पाठलाग करून
त्यांच्यावर दगडफेक करून त्यांच्या अपघातास जबाबदार धरून बाळासाहेब चंदनकर व बळीराम चंदनकर यांच्यावर ३०४ अ
प्रमाणे गुन्हा दाखल करणार असल्याचे अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले़

Web Title: Seven unused laborers missing in trolley canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.