पोलिसांना हवी महसूलप्रमाणे वेतनश्रेणी!
By Admin | Updated: August 28, 2014 03:02 IST2014-08-28T03:02:52+5:302014-08-28T03:02:52+5:30
महसूल खात्याप्रमाणे पोलिसांनाही सहावा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षकापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी केली आहे़

पोलिसांना हवी महसूलप्रमाणे वेतनश्रेणी!
यवतमाळ : महसूल खात्याप्रमाणे पोलिसांनाही सहावा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षकापर्यंतच्या अधिकाऱ्यांनी केली आहे़ महसूल व पोलिसातील पदांची श्रेणी समान आहे, महसुलापेक्षा अधिक काळ आणि धोक्याची नोकरी करूनही वेतनात तफावत का असा प्रश्न पोलिसांनी उपस्थित केला आहे़
राज्य सरकार लक्ष देत नाही म्हणून काही पोलीस निरीक्षकांनी पुढाकार घेत हे प्रकरण ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) नेले. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शासन तेथे आपली बाजू मांडण्यास टाळाटाळ करीत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे़ या याचिकेवर पोलीस महासंचालकांनी शपथपत्र दाखल केले असून महसूल विभागाप्रमाणे पोलिसांनाही वेतनश्रेणी देण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे.
तत्कालीन महासंचालक डी. शिवानंदन यांनी तर पाच पानाचे शपथपत्र दाखल करून वेतनातील तफावत दूर करण्याबाबत जोरदार समर्थन केले होते. राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या सहामाही आढावा बैठकीत वेतनातील तफावतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘पाहू, करू’ एवढीच प्रतिक्रिया व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)