दोन अधिकाऱ्यांसह सात पोलीस निलंबित
By Admin | Updated: April 19, 2017 02:55 IST2017-04-19T02:55:58+5:302017-04-19T02:55:58+5:30
वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीतील सव्वानऊ कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सध्याचे

दोन अधिकाऱ्यांसह सात पोलीस निलंबित
सांगली/कोल्हापूर : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीतील सव्वानऊ कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सध्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे आणि पाच पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. या सर्वांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी घनवट यांना, तर चंदनशिवेंसह सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे व रवींद्र पाटील यांना सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी निलंबित केले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलीस ठाण्यात सव्वानऊ कोटी रुपयांची चोरी व अपहार असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते.
कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा अहवाल सांगली पोलिसांना मंगळवारी मिळाला. त्याच्या आधारे पोलीस प्रमुख शिंदे यांनी चंदनशिवेसह सहा पोलिसांना निलंबित केल्याचा आदेश जारी केला आहे. (प्रतिनिधी)