‘सेतू’मुळे विनाअडथळा प्रवास

By Admin | Updated: August 2, 2016 01:43 IST2016-08-02T01:43:14+5:302016-08-02T01:43:14+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांचे जाळे पसरत आहे.

'Setu' is a non-stop journey | ‘सेतू’मुळे विनाअडथळा प्रवास

‘सेतू’मुळे विनाअडथळा प्रवास

मंगेश पांडे,

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांचे जाळे पसरत आहे. त्यामुळे उपनगरांतील कोणत्याही भागापर्यंत विनाअडथळा, विनावाहतूककोंडी जाणे सहजशक्य बनले आहे. शहर आणि उपनगरांना जोडणारा रस्त्यांचा हा सेतू शहरवासीयांसाठी समाधानकारक ठरत आहे.
औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या शहराला ‘बेस्ट सिटी’चा पुरस्कार मिळाला आहे. विविध उद्योग-व्यवसायांमुळे नोकरीनिमित्त शहरात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्या तुलनेत शहराचा विस्तारही वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे सध्याचे क्षेत्रफळ १७७ चौरस किलोमीटर इतके आहे, तर लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे. नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविताना यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक समजला जाणारा रस्ता याकडे प्राधान्याने लक्ष दिले गेले आहे. याचाच भाग म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहेत. याचा नागरिकांना फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळातही मोठे व प्रशस्त रस्ते बनविण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे शहराच्या कोणत्याही उपनगरातील ठिकाणी पोहोचणे, तसेच एका उपनगरातून दुसऱ्या उपनगरात जाणे सोयीचे झाले आहे. वेळेची बचत होत असून, त्रासही कमी होत आहे.
>ग्रेड सेपरेटरचाही फायदा
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना निगडी ते दापोडी हा साडेबारा किलोमीटर लांबीचा ग्रेड सेपरेटरसह असलेला मार्ग फायदेशीर ठरत आहे. या रस्त्याची एकूण रुंदी तब्बल ६१ मीटर आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच हा मार्ग पार करता येतो. हा मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असतानाही कोठेही वाहतूककोंडी होत नाही, की कसली अडचणही भासत नाही. यासह आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, नाशिक फाटा, कासारवाडी या ठिकाणीही जाता नाही. याचप्रकारे किवळे-सांगवी हा साडेचौदा किलोमीटर लांबीचा बीआरटीएस असलेला मार्गदेखील उपयुक्त ठरत आहे. या रस्त्याची रुंदी ४५ मीटर आहे. मार्गामुळे शहरात काही कारणांनी ‘ट्रॅफिक डायव्हर्जन’ करायचे असल्यास किवळे-सांगवी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. शहराच्या पूर्व-पश्चिम दिशेसाठी हे मार्ग एकप्रकारे सेतू झाले आहेत.
शहरातून उत्तरेकडून दक्षिणेला जाण्यासाठी देहू-आळंदी रोड ते काळेवाडी फाटा या दरम्यान साडेदहा किलोमीटर लांबीच्या
रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता चिखली, जाधववाडी, टेल्को चौक, चिंचवड स्टेशन येथील जुना मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे लाईन,
काळेवाडी असा जातो.
केएसबी चौक ते हिंजवडी हा रस्तादेखील साडेतेरा किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्यामुळेदेखील वाहतूक सोपी झाली आहे.
टेल्को रोडदेखील १२ किलोमीटर लांबीचा बनविण्यात आला
आहे. प्रशस्त रस्त्यामुळे निगडीहून भोसरीहून नाशिक रस्त्याला
जाणे सोपे झाले आहे.
एकूणच बाहेरून शहरात येणाऱ्या, यासह शहरातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने प्रशस्त रस्ते उपयुक्त ठरत आहेत. हे सर्व रस्ते शहरासाठी एकप्रकारे सेतू बनले आहेत. कोणत्याही दिशेने शहरात येऊन विनाअडथळा इच्छितस्थळी जाणे सोयीचे ठरत आहे.
अशा रस्त्यांमुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. यासह वाहतूककोंडी सुटण्यासही मदत होत आहे. काही रस्त्यांची कामे सुरू असून, अशी कामे पूर्णत्वास गेल्यास अधिक सोयीचे होणार आहे.

Web Title: 'Setu' is a non-stop journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.