कौटुंबिक न्यायालयात सुविधांची वानवा

By Admin | Updated: January 5, 2016 02:30 IST2016-01-05T02:30:38+5:302016-01-05T02:30:38+5:30

कौटुंबिक अडचणी सोडविण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या पक्षकारांना कौटुंबिक न्यायालयातील समस्यांनाच तोंड द्यावे लागत आहे.

Services to Family Court | कौटुंबिक न्यायालयात सुविधांची वानवा

कौटुंबिक न्यायालयात सुविधांची वानवा

पुणे : कौटुंबिक अडचणी सोडविण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या पक्षकारांना कौटुंबिक न्यायालयातील समस्यांनाच तोंड द्यावे लागत आहे. अपुऱ्या जागेमुळे सोयी-सुविधांची वानवा असल्यामुळे त्रास सहन करून वकील-पक्षकारांना रोजचे कामकाजाचे सोपस्कर पार पाडावे लागत आहेत. कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनने याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही यात सुधारणा झालेली नाही.
पुण्यात कौटुंबिक न्यायालयाची स्थापना २७ जानेवारी १९८९ मध्ये झाली आहे. सध्या टिळक चौकाजवळील भारती विद्यापीठ भवन येथील सातव्या व नवव्या मजल्यावर या न्यायालयाचे कामकाज चालते. हे मजले भाडेतत्त्वावर असून, शासन दरमहा २ लाख रुपये या जागेच्या भाड्यापोटी भारती विद्यापीठ भवनला देत आहे.
या दोन्हीही मजल्यावर सुरू असलेले कोर्ट हॉल, समुपदेशन कक्ष, चाईल्ड केअर सेंटर, वकील चेंबर व न्यायालयाची प्रशासकीय कार्यालये आहेत. मात्र अपुऱ्या जागेमुळे पक्षकारांसह वकिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाला न्यायालयामध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्या १५०० ते २००० एवढी आहे. दिवसभरात २५ ते ३० खटले येथे दाखल होतात. तर सध्या सुमारे ५ हजार खटले या न्यायालयात प्रलंबित आहेत.
दररोज कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांची मोठी गर्दी होते. त्यांना बसण्यासाठी कोर्ट हॉल, समुपदेश कक्ष व प्रशासकीय कार्यालयाबाहेर बाकडी टाकण्यात आली आहेत. मात्र, गर्दीमुळे बसण्यासाठी ही जागा अपुरी पडते. तसेच ये-जा सुरू असलेल्या मार्गातच ही व्यवस्था करण्यात आली असल्याने नीट चालताही येत नाही. ज्येष्ठ नागरिक, महिलांना उभे राहून सुनावणीची वाट बघावी लागते. पिण्याच्या पाण्याची चांगली
व्यवस्था नाही. एका अडगळीतल्या कोपऱ्यात पिण्याचे पाणी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जण येथील पाणी पिण्याचे जाणीवपूर्वक टाळतात. कधी-कधी पाणी सांडलेले असल्याने अस्वच्छता दिसून येते. कोर्ट हॉल अपुरे असून व्यवस्थित नाहीत. (प्रतिनिधी)

Web Title: Services to Family Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.