नगर रस्त्यावरील सेवा रस्ता गायब
By Admin | Updated: June 10, 2016 00:49 IST2016-06-10T00:49:55+5:302016-06-10T00:49:55+5:30
शहर विकास योजनेअंतर्गत तयार केलेला सर्व्हिस रोड गायब झाला असल्याची तक्रार वडगाव शेरी नागरिक कृती मंचने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली

नगर रस्त्यावरील सेवा रस्ता गायब
पुणे : पुणे-नगर रस्त्यावर शास्त्रीनगर ते खराडी बायपासदरम्यान जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गत तयार केलेला सर्व्हिस रोड गायब झाला असल्याची तक्रार वडगाव शेरी नागरिक कृती मंचने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. नगर रस्त्याच्या मूळ आराख़ड्यात रस्ता होता, त्याप्रमाणे तो तयारही करण्यात आला; मात्र आता तो नाही, असे मंचाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या रस्त्यावर वाहनांचे पार्किंग होत असल्याने तो गायब झाला आहे, अशी माहिती मंचाचे अध्यक्ष आशिष माने यांनी दिली. त्यातून काही भाग शिल्लक राहतो तर त्यावर पथारीवाले, विक्रेते बसतात व रस्ता अडवतात. त्यातूनही रस्ता शिल्लक राहिलाच तर त्यावर पालिकेचे कर्मचारी, काही खासगी बांधकाम व्यावसायिक राडारोडा, कचरा आणून टाकतात. या सर्वांमुळे तो रस्ताच गायब झाला आहे. त्यामुळे बहुतांशी नागरिक चुकीच्या बाजूने वाहने चालवतात व त्यामुळे अपघात होतात, असे माने म्हणाले. पालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून या रस्त्याचे सर्वेक्षण करावे, सर्व्हिस रोड मोकळा करावा, अशी मागणी माने यांनी केली आहे. त्यामुळे रस्ता रुंद होऊन अधिकृत मार्गाने वाहतूक सुरू राहील, वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
>बहुतांशी चालक चुकीच्या बाजूने वाहने चालवतात व त्यातून अपघात होतात; त्यामुळे या रस्त्याचे सर्वेक्षण करावे, सर्व्हिस रोड मोकळा करावा.