सेवाभावी डॉक्टरांची वारी
By Admin | Updated: July 4, 2016 03:34 IST2016-07-04T03:34:13+5:302016-07-04T03:34:13+5:30
पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ठाण्यातील औषधवारी गुरुवारी प्रस्थान करीत आहे.

सेवाभावी डॉक्टरांची वारी
प्रज्ञा म्हात्रे,
ठाणे- पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ठाण्यातील औषधवारी गुरुवारी प्रस्थान करीत आहे. श्री ज्ञानदेव सेवा मंडळातर्फे ठाण्यातील सेवाभावी डॉक्टर ओमप्रकाश शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली २५ कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह ही औषधवारी निघत आहे. वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा, या भावनेनेच हे सेवेकरी यात दरवर्षी सहभागी होतात.
पंढरीच्या वारीला जाणाऱ्या अनेक वारकऱ्यांना सांधेदुखी, पायाला सूज येणे, रक्तदाब वाढणे, जुलाब, खोकला, त्वचेचे विकार यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. वारीदरम्यान त्यांना औषधपाण्याची सोय नसल्याने वारकऱ्यांची मोठी पंचाईत होते. त्यांची ही अवस्था पाहून ३४ वर्षांपूर्वी मंडळाने वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना डॉ. शुक्ल यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली.
४० टक्के अध्यात्म व ६० टक्के समाजसेवा हे मंडळाचे उद्दिष्ट असल्याने हा सामाजिक उपक्रम मंडळाने हाती घेतला. पहिल्या वर्षी चार ते पाच कार्यकर्त्यांना घेऊन ही औषधवारी निघाली होती. आता पाचचे २५ कार्यकर्ते झाले आहेत. छोट्या जीपपासून सुरू केलेला प्रवास आता मोठ्या बसने केला जातो. तब्बल सात दिवस डॉ. शुक्ल आणि त्यांची टीम वारकऱ्यांना अहोरात्र मोफत वैद्यकीय सेवा देते. या २५ जणांमध्ये १३ डॉक्टर्स आणि १२ संस्थेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
देणगीदारांचा वर्षानुवर्षे प्रतिसाद वाढत असून यंदा आठ ते दहा लाखांची औषधे जमा झाली आहेत. यात ५० हजारांची औषधे मंडळ खरेदी करते व उर्वरित औषधे ही देणगीच्या स्वरूपात जमा केली जातात. अनेक महिन्यांपासून औषधांची जमवाजमव, वर्गीकरणाची तयारी सुरू होते. दररविवारी मंडळाच्या सभागृहात हे काम चालते. रविवारी वर्गीकरणाचा शेवटचा दिवस होता. विशेष म्हणजे डॉ. शुक्ल यांच्यासह येणारे डॉक्टर्स दवाखाना सातही दिवस बंद ठेवून सेवाभावी उद्देशाने औषधवारीत सहभागी होतात. या सात दिवसांत तब्बल आठ हजारांहून अधिक वारकऱ्यांना सेवा दिली जाते. आता प्रत्येक थांब्यावर आमची झाडे ठरली असून तेथेच कॅम्प लावला जातो.
समाजऋण फेडण्याची भावना मनात ठेवून डॉ. शुक्ल यांनी ३४ वर्षांपूर्वी या कार्याला सुरुवात केली. आज वयाच्या ६७ व्या वर्षी ते अखंडपणे हे कार्य करीत आहेत. प्रत्येक वारकरी हा मला विठोबाच्या रूपाने भेटतो. आज या वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे ही सेवा अखंडपणे सुरू आहे. आदल्या वर्षी ज्या वारकऱ्याला औषधोपचार दिले, तो वारकरी पुढच्या वर्षी नक्की आम्हाला भेटून जातो आणि कौतुकाची थाप पाठीवर मारतो. ही थाप म्हणजे ईश्वराची थाप आहे आणि ती वारंवार मिळावी, म्हणूनच दरवर्षी ही औषधवारी घेऊन जात असतो, असे डॉ. शुक्ल सांगतात.
वैद्यकीय सेवा देणारे डॉ. शुक्ल आणि त्यांची टीम यांना जेवण बनवून देण्यासाठी विभावरी जोशी ऊर्फ जोशीकाकू या गेल्या १६ वर्षांपासून त्यांच्यासोबत जात आहेत. वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या या सेवेकरींना स्वादिष्ट जेवण देणे, हेच जोशीकाकूंचे मुख्य उद्दिष्ट असल्याने वयाच्या ७६ व्या वर्षीही त्या ही जबाबदारी हसतमुखपणे सांभाळत आहेत. दरवर्षी या वारीतून वेगळ्या अनुभवाची शिदोरी आम्ही घेऊन येतो. मी सकाळी ६ वाजता उठून नाश्त्याच्या तयारीला लागते. थोडेसे जेवण जास्तच बनवते, कारण ज्या वारकऱ्याला जेवण मिळत नाही, त्यांनाही आम्ही जेवण देतो, असे जोशीकाकू आवर्जून सांगतात.