कारागृहातील अनागोंदीची गंभीर दखल

By Admin | Updated: July 11, 2014 01:17 IST2014-07-11T01:17:13+5:302014-07-11T01:17:13+5:30

नागपूर मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या अनागोंदीची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून, खतरनाक आणि श्रीमंत कैद्यांना सुखसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर

Serious intimidation of imprisonment in jail | कारागृहातील अनागोंदीची गंभीर दखल

कारागृहातील अनागोंदीची गंभीर दखल

अधिकाऱ्यांवर कारवाई : वरिष्ठ पातळीवरून संकेत
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या अनागोंदीची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून, खतरनाक आणि श्रीमंत कैद्यांना सुखसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी उच्चाधिकाऱ्यांनी केल्याची संबंधित सूत्रांची माहिती आहे. कारागृह उपमहानिरीक्षक सध्या सुटीवर असल्याने कारवाईची अंमलबजावणी थांबल्याचेही सूत्रांचे सांगणे आहे.
भक्कम तटबंदी आणि राज्यातील अतिसुरक्षित कारागृहांपैकी एक कारागृह म्हणून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाचे नाव घेतले जाते. त्यामुळे येथे बॉम्बस्फोटातील दहशतवादी, नक्षलवादी, मुंबई अंडरवर्ल्ड डॉन, त्यांचे शूटर, पाकिस्तान तसेच अन्य विदेशी कैद्यांना येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाते. सध्या येथे अनेक दहशतवादी, नक्षलवादी अन् अनेक विदेशी कैदी आहेत. या कारागृहाच्या आतमध्ये प्रचंड अनागोंदी कारभार सुरू आहे.
कारागृहात बंदिस्त असलेल्या खतरनाक कैद्यांना कारागृहातील बराकीतच अंडी, चिकन, मटन, तंदूर, बिर्याणी आणि थंडगार बीअरसह महागड्या (ब्राण्डेड) दारूच्या बाटल्या, गांजा, गर्द, चरस असे अमली पदार्थ पुरविले जातात. त्यांना मोबाईल उपलब्ध करून दिले जातात. हे गुंड (कैदी) मोबाईलवरून शहरातील आपल्या चेल्याचपाट्यांसोबत तसेच व्यापारी, उद्योजकांसोबत संपर्क साधून त्यांना धमक्या देतात. खंडणी मागतात. कोट्यवधींच्या वादग्रस्त जमिनीच्या आतूनच (मोबाईलच्या माध्यमातून) मांडवल्या करतात आणि लाखो रुपये पदरी पाडून घेतात. या पैशातूनच त्यांचे चेलेचपाटे संबंधित गुंडांच्या कोर्ट कारवाईची आणि कारागृहातील ऐषोआरामाची व्यवस्था करतात. भ्रष्ट अधिकाऱ्यांना यातून हजारो रुपये दिले जाते. त्यामुळे या गुंडांना संबंधित अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरून कारागृहात घरच्यासारख्या सोयीसुविधा मिळतात. गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकार नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बिनबोभाट सुरू आहे. अनेकदा आकस्मिक झडतीत हे सर्व सापडले असून, त्याच्या वेळोवेळी वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून वृत्तही छापून आले आहे. सुजाण नागरिकांनी याबाबत अनेक राज्य सरकार, गृहमंत्री, कारागृह प्रशासनाकडे तक्रारीही केल्या.
गेल्या आठवड्यात गृहमंत्री आर.आर. पाटील आणि पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्याकडेही कारागृहातील गैरप्रकाराच्या तक्रारी करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर, येथील कारागृहाची तपासणी करण्यासाठी कारागृह महानिरीक्षक, अतिरिक्त महासंचालक मीरा बोरवणकर यांनी २८ जून रोजी पुण्यावरून दक्षता चमू पाठविली होती. आकस्मिक छापा घालून कारागृहातील स्थिती तपासण्याची या पथकाची योजना होती. मात्र, पहाटे पोहचलेल्या या चमूला तुरुंगाच्या मुख्य द्वारावर बराच वेळ रोखून धरण्यात आले. दक्षता पथकाचे नेतृत्व करणाऱ्या सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने आपली ओळख देऊनही त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
शेवटी पुणे मुख्यालयातून या पथकाला सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर पथक कारागृहाच्या आतमध्ये पोहचले. तोपर्यंत आतमध्ये सर्व आलबेल करून घेण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यासाठी एका अधिकाऱ्याने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आतमध्ये कोणतीही आक्षेपार्ह वस्तू अथवा स्थिती दिसू नये, असा सूचनावजा इशारा दिला. त्यामुळेच नंतर कारागृह तपासणीला गेलेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.(प्रतिनिधी)
पथकाचा अहवाल
सूत्रांच्या माहितीनुसार, या पथकाने नागपुरातील दौ-याचा अनुभववजा अहवाल कारागृह प्रशासनाच्या पुण्यातील अधिकाऱ्यांना दिला. त्याची उच्च पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची शिफारस करण्यात आल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या तुरुंग महानिरीक्षक (एडीजी) मीरा बोरवणकर यांच्याशी संपर्क साधून, त्यांना दक्षता पथकाला रोखण्याच्या गंभीर प्रकरणात काय कारवाई करणार, अशी विचारणा लोकमत प्रतिनिधीने केली. ‘मला झालेला प्रकार कळला. मात्र, माझ्याकडे संबंधित अधिकाऱ्यांची लेखी तक्रार अद्याप पोहचलेली नाही. त्यामुळे कारवाईबाबत बोलणे योग्य होणार नाही’, असे त्या म्हणाल्या.
उपमहानिरीक्षक सुटीवर
नागपूर कारागृहात सुरू असलेल्या गंभीर प्रकरणाला वरिष्ठ कारागृह अधीक्षक वैभव कांबळेच जबाबदार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या विशिष्ट भूमिकेमुळेच असे प्रकार येथे घडू लागल्याचाही आरोप होतो. यामुळे त्यांच्यावर काही कारवाई होणार काय, याबाबत बोरवणकर यांच्याकडे विचारणा केली असता येथील कारागृह उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे सध्या सुटीवर आहेत. ते परतल्यानंतर कोण दोषी आहेत, त्याचा अहवाल मागितला जाणार, त्यानंतरच कारवाईचे स्वरूप ठरेल, असे बोरवणकर म्हणाल्या. कारागृहातील अनागोंदी आणि अधिकाऱ्यांवर होणाऱ्या आरोपाच्या अनुषंगाने कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांच्याशी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.

Web Title: Serious intimidation of imprisonment in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.