ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम
By Admin | Updated: June 3, 2015 02:13 IST2015-06-03T02:13:37+5:302015-06-03T02:13:37+5:30
ग्लोबल वॉर्मिंगमुळे राज्यातील पर्यावरणीय अस्थिरतेमध्ये वाढ झाली असून सर्वाधिक अस्थिरता नंदुरबारमध्ये असून त्याखालोखाल धुळे, बुलढाणा,

ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम
संदीप प्रधान, मुंबई
ग्लोबल वॉर्मिंगमुळे राज्यातील पर्यावरणीय अस्थिरतेमध्ये वाढ झाली असून सर्वाधिक अस्थिरता नंदुरबारमध्ये असून त्याखालोखाल धुळे, बुलढाणा, जळगाव, हिंगोली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रालगतच्या समुद्राच्या पातळीत २०५० पर्यंत २ सेमी तर २१०० पर्यंत ४ सेमी इतकी वाढ संभवते.
पर्यावरण विभागाने ग्लोबल वॉर्मिंगच्या गंभीर परिणामाबाबत मंगळवारी मंत्रालयात सादरीकरण केले. अमरावती विभागात बुलडाणा, औरंगाबाद विभागात हिंगोली, कोकण विभागात ठाणे, नागपूर विभागात गोंदिया, नाशिक विभागात नंदुरबार तर पुणे विभागात सोलापूर या जिल्ह्यांत पर्यावरणीय अस्थिरता सर्वाधिक आढळली आहे. महाराष्ट्र स्टेट अॅक्शन प्लान्स आॅन क्लायमेट चेंज या डॉ. राजेंद्र पचौरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवालानुसार महाराष्ट्रात ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. नजिकच्या काळात राज्याच्या पर्जन्यमानात बदल होतील, असे दिसते. २०३० पर्यंत वार्षिक सरासरी तापमानात १.०५ ते १.४ डिग्री सेल्सिअस वाढ होईल तर २०८० सालापर्यंत तापमानातील ही वाढ २.१८ ते ३.०९ डिग्री सेल्सिअस एवढी अपेक्षित आहे. परिणामी २०३० पर्यंत अमरावती विभागाचे तापमान १.४४ ते १.६४ डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद विभागाचे तापमान १.४४ ते १.५६ डिग्री सेल्सिअस, नाशिक विभागाचे तापमान १.४ ते १.६८ डिग्री सेल्सिअस, नागपूर विभागाचे तापमान १.१८ ते १.४ डिग्री सेल्सिअस, पुणे विभागाचे तापमान १.१५ ते १.२८ डिग्री सेल्सिअस, कोकण विभागाचे तापमान १.१ ते १.२८ डिग्री सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे.