७00 रुपयांसाठी दीड वर्षे कारागृहात काढल्यानंतर आरोपी निर्दोष!
By Admin | Updated: April 8, 2016 02:10 IST2016-04-08T02:10:06+5:302016-04-08T02:10:06+5:30
१३ साक्षीदार जबाबावर कायम; तरीही सबळ पुरावा नाही.

७00 रुपयांसाठी दीड वर्षे कारागृहात काढल्यानंतर आरोपी निर्दोष!
अकोला: बौद्ध विहारातील ७00 रुपयांच्या चोरी प्रकरणात दीड वर्षांपासून कारागृहात असलेल्या आरोपीची प्रथम श्रेणी न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. तेरा साक्षीदार जबाबावर कायम असतानाही सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने आरोपीची सुटका केली.
शंकरनगरमध्ये असलेल्या बौद्ध विहारात ४ जानेवारी २0१५ रोजी ७00 रुपयांची चोरी केल्याचा आरोप बिहारचा रहिवासी राजीव छोटू तांबूल याच्यावर होता. या प्रकरणी राजकुमार रंगारी यांनी आकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तांबूल याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीकडून ५८0 रुपये रोख जप्त करून त्याला अटक केली. ४ जानेवारी २0१५ पासून आरोपी अद्यापही कारागृहात आहे. सरकार पक्षाने कलम ३८0 नुसार गुन्हय़ात वाढ केली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रांजली राणे यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने एकूण १३ साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदार जबाबावर कायम राहिले. जप्तीतील ५८0 रुपयेही न्यायालयात सादर करण्यात आले; मात्र सरकार पक्ष सबळ पुरावे सादर करण्यास, तसेच गुन्हा सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ए. के. अनोकार यांनी, तर आरोपीतर्फे अँड. केशव एच. गिरी व वैशाली गिरी भारती यांनी कामकाज पाहिले. आरोपी राजीव तांबूल याला न्यायालयाने निर्दोष ठरवले असले, तरी त्याला अटक केल्यानंतर जमानतदारच न भेटल्याने तो एक वर्षे ४ महिन्यांपासून कारागृहात होता.