आत्महत्येच्या इशाऱ्याने नवी मुंबईत खळबळ

By Admin | Updated: August 5, 2016 02:30 IST2016-08-05T02:30:08+5:302016-08-05T02:30:08+5:30

वाघिवली गावामधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे पूर्ण गावानेच शासनाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.

Sensation of suicide in Navi Mumbai | आत्महत्येच्या इशाऱ्याने नवी मुंबईत खळबळ

आत्महत्येच्या इशाऱ्याने नवी मुंबईत खळबळ


नवी मुंबई : वाघिवली गावामधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे पूर्ण गावानेच शासनाकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. या वृत्ताने नवी मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ग्रामस्थांची भेट घेवून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.
शासनाने नवी मुंबई वसविण्यासाठी ठाणे, पणवेल व उरण तालुक्यामधील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे. ४५ वर्षांनंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. सर्वात गंभीर स्थिती पनवेल तालुक्यामधील वाघिवलीमधील प्रकल्पग्रस्तांची आहे. येथील ६६ कुळांची नावेच सातबाऱ्यावरून वगळण्यात आली आहेत. तब्बल १५२ एकर जमीन संपादित करून त्याचा काहीही मोबदला दिलेला नाही. शेतकऱ्यांच्या साडेबारा टक्के योजनेचा लाभ सावकाराला देण्यात आला असून त्याने मिळालेले भूखंड परस्पर विकले आहेत. पाठपुरावा करूनही सिडको व शासनाकडून न्याय मिळत नसल्याने ग्रामस्थांनी सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी असा अर्ज मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. प्रकल्पग्रस्त संघटनांनी वाघिवली ग्रामस्थांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
वाघिवली ग्रामस्थांच्या इशाऱ्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. एनआरआय पोलिसांनी ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले होते. ग्रामस्थांशी संवाद साधून आत्महत्या करण्यापासून परावृत्त व्हावे असे सांगितले. परंतु ग्रामस्थांनी आत्महत्येच्या मुद्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. वडिलोपार्जित जमीनही गेली व मोबदलाही मिळालेला नाही. यामुळे शासनाने आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही आत्महत्या करणार असे स्पष्ट केले आहे. यामुळे भविष्यात हा संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासन व सिडको प्रशासन याविषयी काय भूमिका घेणार याकडे आता ग्रामस्थांसह सर्व प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sensation of suicide in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.