सेनेच्या गटनेतेपदाला ग्रहणच!
By Admin | Updated: October 9, 2014 23:00 IST2014-10-09T22:01:27+5:302014-10-09T23:00:47+5:30
पक्षीय कुरबूर : १९८५ पासूनचा इतिहास आजही कायम

सेनेच्या गटनेतेपदाला ग्रहणच!
रत्नागिरी : शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यात असलेली युती तोडून दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवित आहेत. कोकणात शिवसेना सर्वाधिक रूजली असली तरी महाराष्ट्रातही आपले स्थान बळावले आहे. परंतु तेथेही पक्षांतर्गत कुरबुरी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येक कार्यकर्ता स्वत:चे अस्तित्व राखण्यात यशस्वी होत असताना सेनेच्या गटनेते पदाला मात्र ग्रहण लागलेले दिसून येत आहे. १९८५पासूनचा इतिहास पाहता सेना गटनेत्यांवर पक्षाबाहेर जाण्याची वेळ आली आहे.
माझगाव (मुंबई) येथून सेनेच्या तिकिटावर १९८५ साली छगन भुजबळ निवडून आले होते. १९८६ साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये रमेश प्रभू यांनी बालेकिल्ला जिंकला. मात्र, १९९0च्या निवडणुकीत रमेश प्रभू यांना सेनेने तिकीट नाकारल्यामुळे ते अपक्ष लढले. ८६च्या निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे सहा वर्षांसाठी कोर्टाने सेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार काढून घेतला होता. १९९०च्या निवडणुकीत डझनभर आमदारांसह भुजबळांनी बंडखोरी करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सेनाबळ घटल्याने विरोधी पक्ष नेते मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्याने गटनेतेपदी गणेश नाईक यांची निवड करण्यात आली होती. १९९५पर्यंत नाईक गटनेते पदी होते. १९९५मध्ये भाजप-सेनेला महाराष्ट्रात सत्ता मिळाली. परिणामी गणेश नाईक यांना पर्यावरणमंत्रीपद मिळाले. परंतु पक्षातील नेत्यांशी त्यांचे मतभेद असल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. १९९९मध्ये नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जानेवारी ते आॅक्टोबर १९९९ अखेर नारायण राणे मुख्यमंत्री होते. मात्र, १९९९ ते २००४ पर्यंत राणे विरोधीपक्ष नेते झाले. परंतु जुलै २00५मध्ये राणेंचे सेनेत मतभेद झाल्याने त्यांनी थेट काँग्रेस पक्षात उडी घेतली. त्यानंतर रामदास कदम यांची नियुक्ती विरोधी पक्षनेतेपदावर झाली. २००९ च्या निवडणुकीत खेड मतदारसंघाचे स्वतंत्र अस्तित्वच पुसले गेले. दापोली व गुहागर तालुक्यात विभागणी झाली. कदम गुहागरात निवडणूक लढवित असताना पराभूत झाले. सन २०१० मध्ये त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. मात्र, पराभवानंतर कदम मात्र फारसे सक्रीय दिसले नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते लांबच राहिले. सन २००९ मध्ये सुभाष देसाई गटनेते झाले.
भाजपशी वर्षानुवर्षे असलेली संगत तोडून सेना सध्या स्वबळावर निवडणूक लढवत आहे. कदम यांना मुंबई किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून उमेदवारी देणे सेनेला शक्य होते. मात्र, त्यांच्याबाबत सेनेने स्वारस्य नसल्याचे दाखवले आहे. शिवाय गतवर्षीच्या दसरा मेळाव्यातील मनोहर जोशींचा अपमानदेखील कार्यकर्त्यांनी पाहिला आहे. सुभाष देसाई यांचाही सेनेने पत्ता कापला आहे. एकूणच सेनेच्या गटनेतेपदालाच वावडे असल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षातील अंतर्गत धुसपूस किंवा नेत्यांमधील स्वार्थीपणा देखील गटनेतेपदी स्थिर राहिलेला नाही. शिवाय गटनेत्यांचा पक्षाने सन्मान केला असला तरी वेळ पाहून नसही कापली आहे, असे म्हणणे उचित ठरेल. (प्रतिनिधी)
१९९०मध्ये रमेश प्रभू यांना सेनेने तिकीट नाकारल्याने अपक्ष लढले.
१९९०च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी डझनभर आमदारांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश.
१९९९मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेनेला केला जय महाराष्ट्र.
२००५मध्ये नारायण राणेंचे सेनेत मतभेद झाल्याने काँग्रेस पक्षात घेतली उडी.
आता वेळ रामदास कदमांची?