ठाणे : ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३१ अ च्या शिवसेनेच्या नगरसेविका संगीता पाटील यांच्यावर गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास १० ते १२ जणांच्या टोळक्याने तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यात त्या बचावल्या असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यातून त्यांचा बचाव करण्यासाठी आलेले आणखी तीन कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. या प्रकरणी संगीता यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून त्यांचे घटस्फोटित पती माजी नगरसेवक माणिक पाटील यांना श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.रवी वाघमारे, तुषार केसरकर, सुनील बनसोडे अशी या हल्ल्यात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे आणि आमदार रवींद्र फाटक यांनी रुग्णालयात जाऊन संगीता यांची विचारपूस केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट परिसरातील शांतीनगर येथील कार्यालयात पाटील काम करत होत्या. त्या वेळी कार्यालयात अचानक तलवारीसह आलेल्या एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला मार लागला, तर मध्यस्थी करणारे तिघे कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी संगीता यांनी त्यांचे पूर्वाश्रमीचे पती माणिक पाटील यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्यांना घोडबंदर येथील घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांनी सांगितले. माणिक यांचे यापूर्वी दोन विवाह झाले असून, संगीता त्यांची तिसरी पत्नी होती. संगीता यांचा माणिक यांच्याशी घटस्फोट झाला असून, याबाबतचा दावा न्यायालयात सुरू आहे. माणिक यांच्याबरोबर आपल्याला राहायचे नाही, असे संगीता यांचे म्हणणे आहे. यातून पवार या सहकाऱ्याच्या मदतीने आपल्यावर हल्ला केल्याचा संशय संगीता यांनी व्यक्त केला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी माणिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)>हल्लेखोरांना पकडण्यासाठी तीन पथकेनगरसेविकेवर हल्ला करणाऱ्यांची रेखाचित्रे तयार करण्यात आली असून, हल्लेखोरांना पकडण्यासाठी तीन पथके तयार केली आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.व्ही. कारकर यांनी सांगितले.
सेनेच्या नगरसेविकेवर हल्ला
By admin | Updated: June 10, 2016 05:01 IST