सेनेच्या आरती बोरकरांची हत्या

By Admin | Updated: August 3, 2014 01:01 IST2014-08-03T01:01:41+5:302014-08-03T01:01:41+5:30

काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध लढणाऱ्या लालगंज परिसरातील शिवसेनेच्या माजी पदाधिकारी आरती बोरकर यांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचे पती अनिल बोरकर

Seni's Aarti Borkar murder | सेनेच्या आरती बोरकरांची हत्या

सेनेच्या आरती बोरकरांची हत्या

लालगंज परिसरात जाळपोळ : इतवारी, मस्कासाथ बंद
नागपूर : काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध लढणाऱ्या लालगंज परिसरातील शिवसेनेच्या माजी पदाधिकारी आरती बोरकर यांची शुक्रवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचे पती अनिल बोरकर गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेततही अनिल आणि त्यांच्या साथीदारांनी एका हल्लेखोराला पकडले. काळाबाजार करणारे रॉकेल माफिया आणि चटणी डेपो चालकांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे.
पोलीस सूत्रांनुसार आरती बोरकर यांची शिवसेनेच्या आक्रमक पदाधिकारी म्हणून ओळख होती. त्या मध्य नागपूर महिला आघाडीच्या प्रमुख होत्या. परिसरात काळाबाजार करणाऱ्यांच्या विरोधात त्या लढत होत्या. त्यांच्या आंदोलनामुळे रवि खंते यांचा रॉकेल डेपो आणि केशरवानी कुटुंबीयांचा मिरची पावडरचा (चटणी) डेपो बंद पडला होता. त्यामुळे ते बोरकर यांच्यावर चिडून होते. या वैमनस्यातूनच आरती बोरकर व त्यांचे पती अनिल बोरकर यांच्या खुनाची सुपारी हल्लेखोरांना देण्यात आल्याची तक्रार जखमी अनिल बोरकर यांनी पाचपावली पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर शुक्रवारी रात्री मेयो रुग्णालयात तणाव होता. राऊत चौकातही शनिवारी सकाळपासून तणाव पसरला होता. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. आरती बोरकर यांना ११ व ९ वर्षाची दोन मुले आहेत. अनिल बोरकर यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. सूत्रांनुसार लालगंज परिसरातील राऊत चौकात आरती अनिल बोरकर यांचे घर आहे. रात्री जेवण झाल्यानंतर आरती या पती अनिलसोबत चौकात विकास मोटघरे यांच्या घरासमोर बोलत उभ्या होत्या. ९ .१५ वाजताच्या दरम्यान अ‍ॅक्टीव्हा गाडीवर स्वार होऊन आरोपी आकाश दोरखंडे व त्याचे साथीदार आले.
मेयोमध्ये शिवसैनिकांची गर्दी
आरती बोरकर यांची हत्या करण्यात आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. शिवसेना नेते शेखर सावरबांधे, सुरज गोजे यांच्यासह शेकडो शिवसैनिक मेयो रुग्णालयात जमा झाले. तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कार्यकर्ते संतापले होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत केले.
धारदार शस्त्रांनी हल्ला
धारदार शस्त्रांनी अनिलवर हल्ला करण्यात आला. पत्नी आरती त्यांना वाचविण्यासाठी धावल्या त्यांनी एका आरोपीला पकडले. त्यामुळे आरोपींनी त्यांना जमिनीवर पाडले व शस्त्रांनी वार करून त्यांचा खून केला.
अनिल यांनी दाखविली हिंमत
अनिल आणि आरती यांच्यावर हल्लेखोर वार करीत असताना शेकडो लोक मूकदर्शक बनून उभे होते परंतु कुणीही वाचवण्यासाठी पुढे यायला तयार नव्हते. अनिल यांनी हिंमत दाखवित जखमी अवस्थेतही आकाश दोरखंडेला जखडले. अनिलची हिंमत पाहून विकास मोटघरे व इतरही पुढे आले. अचानक शेकडो लोक आरोपींवर धावून गेले. लोक येत असल्याचे पाहून दोन आरोपी पळाले. परंतु आकाशला अनिलने पकडून ठेवल्याने त्याची नागरिकांनी चांगलीच धुलाई केली. संतापलेल्या नागरिकांच्या मारामुळे आरोपीची वाचण्याची शक्यता कमीच होती. परंतु घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्ती करून आरोपीला वाचविले. त्यानंतर आरती व अनिल यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आरती यांना तपासून मृत घोषित केले.
इतवारी बंद
दरम्यान दुपारी आरती बोरकर यांच्या अंत्ययात्रेदरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण होते. शिवसैनिकांनी इतवारी बाजार बंद पाडला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवून या घटनेचा निषेध करण्यात आला. पाचपावली पोलीस ठाण्यावरही शिवसैनिकांनी धडक दिली. शिवसैनिकांचा संताप लक्षात घेता पोलीसही कामाला लागले. आकाश दोरखंडे या आरोपीला नागरिकांनीच पकडले होते. त्याचे साथीदार सुपारी किलर विशाल ऊर्फ सोनू मोहनदास खरे, विक्की राजू खरे आणि सुपारी देणारे सुरेंद्र केशरवानी यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Seni's Aarti Borkar murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.