ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कराडकर यांचे निधन

By Admin | Updated: January 21, 2015 00:31 IST2015-01-21T00:15:42+5:302015-01-21T00:31:58+5:30

अंत्यदर्शनासाठी गर्दी : आज सांगलीत अंत्यसंस्कार

Senior freedom fighter Karadkar passes away | ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कराडकर यांचे निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कराडकर यांचे निधन

सांगली : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पुरोगामी कृतिशील कार्यकर्ते आणि क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, वसंतदादा पाटील यांचे निकटचे सहकारी नामदेवराव बाळकृष्ण कराडकर (वय ९१) यांचे आज, मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. त्यांच्या निधनाने स्वातंत्र्यलढ्यातील आणखी एक दुवा निखळल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच होते. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई, चतुरंग अ‍ॅडव्हर्टायझर्सचे संचालक, कवी महेश आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते राजेश ही दोन मुले, दोन विवाहित कन्या, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. दादा नावाने परिचित असलेल्या नामदेवराव कराडकर यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. क्रांतिलढ्याची पत्रके वाटणे, क्रांतिकारकांचे संदेश पोहचविणे, स्फोटके आणि शस्त्रांचा साठा सुरक्षित ठेवणे यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, वसंतदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ते ब्रिटीशांविरोधात लढले. क्रांतिलढ्यात त्यांनी वसंतदादांसोबतच कारावास भोगला होता. २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा तुरुंग फोडण्याची कामगिरी करणाऱ्या वसंतदादांसोबतच्या क्रांतिकारकांच्या गटात ते सहभागी होते. स्वातंत्र्यानंतर कराडकर यांनी कामगार चळवळीत स्वत:ला झोकून दिले. साखर कामगार आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी लढा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कामगार चळवळ, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, आयुर्वेद, अध्यात्म अशा विविध क्षेत्रात त्यांनी लोकहिताचा हेका घेऊन कोणताही अभिनिवेष न बाळगता कार्यरत राहणे पसंत केले. सांगली जिल्'ातील पुरोगामी चळवळीला बळ देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी अखेरपर्यंत पुरोगामी कृतिशीलता जपली. अत्यंत साधी राहणी आणि कणखर विचार हे त्यांचे वैशिष्ट्य होय. सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, वाळव्याचा हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना, यशवंत सहकारी सिमेंट संस्था, शाहू इन्स्टिट्यूट या संस्थांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला होता. बलवडी येथील बळीराजा धरण उभारणीतही ते अग्रभागी होते. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत उद्या (बुधवारी) सकाळी ९ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Senior freedom fighter Karadkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.