ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांचे निधन
By Admin | Updated: December 12, 2014 00:06 IST2014-12-12T00:04:05+5:302014-12-12T00:06:25+5:30
सोंगाड्या, मर्दानी, बन्या बापू अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक व ज्येष्ठ निर्माते

ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांचे निधन
कोल्हापूर : सोंगाड्या, मर्दानी, बन्या बापू अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक व ज्येष्ठ निर्माते गोविंद कुलकर्णी (वय ८४) यांचे आज, गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, मुले डॉ. चारूहास भागवत, उमेश भागवत व मुलगी असा परिवार आहे.
वृद्धापकाळामुळे गेले काही दिवस कुलकर्णी आजारी होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दुपारी तीन वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोविंद कुलकर्णी हे मूळचे पैठणचे. त्यांचे खरे नाव शरद्चंद्र भागवत. चित्रपटांचे प्रचंड आकर्षण असल्याने त्यांनी घर सोडून कोल्हापुरात पाऊल ठेवले. गोविंद कुलकर्णी या नावाने त्यांनी चित्रपट कारकीर्द सुरू केली. ‘मुरळी मल्हारीरायाची’ या चित्रपटाचे १९६९ साली दिग्दर्शन करून त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. अशी रंगली रात्र, चुडा तुझा सावित्रीचा, एकटा जीव सदाशिव, हऱ्या-नाऱ्या झिंदाबाद, लागेबांधे, गोविंदा आला रे आला, जय तुळजाभवानी, मानाचं कुंकू, बन्या बापू, हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘असंच पाहिजे नवं नवं’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट.
रक्षाविसर्जन उद्या, शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता आहे. अंत्यसंस्कारास चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, संचालक सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती, बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांच्यासह कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.