केडीएमसीवर ज्येष्ठ धडकले

By Admin | Updated: September 22, 2016 03:41 IST2016-09-22T03:41:50+5:302016-09-22T03:41:50+5:30

ज्येष्ठ नागरिकांचे धोरण जाहीर करावे यासह अन्य मागण्यांसाठी २५० ते ३०० ज्येष्ठ नागरिकांनी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा काढला

Senior Cadmac | केडीएमसीवर ज्येष्ठ धडकले

केडीएमसीवर ज्येष्ठ धडकले


कल्याण : केडीएमसीने ज्येष्ठ नागरिकांचे धोरण जाहीर करावे यासह अन्य मागण्यांसाठी २५० ते ३०० ज्येष्ठ नागरिकांनी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा काढला. महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेत बहुतांश मागण्या मान्य केल्या. महासभेत या धोरणाला मान्यता घेऊ व ते लवकरच अमलात आणू, असे आश्वासन त्यांनी दिले.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) व कोकण प्रादेशिक विभाग यांच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला. महासंघाने चार वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन केडीएमसीच्या आयुक्तांना सादर केले होते. त्यासंदर्भात तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनावणे आणि महापौर कल्याणी पाटील यांच्याशीही चर्चा केली होती. परंतु, या मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ ‘फेस्कॉम’चे अध्यक्ष रमेश पारखे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
डोंबिवली पूर्वेतील ब्राह्मण सभेनजीकच्या नाट्यकट्टा येथून निघालेला मोर्चा टिळक चौकमार्गे मानपाडा रोड येथून मार्गस्थ होत महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर आला. देवळेकर यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी त्यांच्यासोबत सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक राजन आभाळे, संदीप पुराणिक, निलेश म्हात्रे, उपायुक्त सुरेश पवार उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार महापालिका रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष असावा, तेथे योग्य उपचार मिळावेत आणि डोंबिवलीतील बालभवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह तसेच महापालिकेच्या मालकीची अन्य सभागृहे सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावीत, विरंगुळा केंद्रे स्थापन करावीत, विक्रेत्यांनी व्यापलेली पदपथे मोकळी करावीत, १५ जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक-जागृती दिवस, २१ सप्टेंबर जागतिक स्मृतिभ्रंश दिवस व १ आॅक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस हे तीन दिवस केडीएमसीतर्फे विविध उपक्रमांद्वारे साजरे करावेत, केडीएमसीच्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी, यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
>सकारात्मक प्रतिसाद
महापौर देवळेकर यांच्याशी झालेल्या चर्चेत ज्येष्ठांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. प्रशासनाने आतापर्यंत आमचा फुटबॉल केला, असा आरोप या वेळी त्यांनी केला. दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, तेथे मुबलक स्वरूपात खाटा उपलब्ध असतील, महापालिकेची सभागृहे सवलतीच्या दरात कार्यक्रमांसाठी उपलब्ध होतील, प्रभागनिहाय विरंगुळा केंदे्र उभारण्यात येतील, १ आॅक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस महापालिकेतर्फे साजरा करण्यात येईल, ५०० मीटर अंतरावर ई-टॉयलेट उभारण्यात येतील, अशी ग्वाही देवळेकर यांनी शिष्टमंडळाला दिली. वर्षातून दोनदा आयुक्तांनी भेट द्यावी, ही ज्येष्ठांची मागणीही या वेळी मान्य करण्यात आली.

Web Title: Senior Cadmac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.