ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर कालवश

By Admin | Updated: November 3, 2014 14:46 IST2014-11-03T08:32:50+5:302014-11-03T14:46:44+5:30

दमदार अभिनयामुळे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले.

Senior actor Sadashiv Amrapurkar Kalvash | ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर कालवश

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर कालवश

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ - दमदार अभिनयामुळे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अमरापूरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. 

हिंदी, मराठी सिनेमा आणि रंगभूमी अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या चतुरस्त्र अभिनयाची मोहोर उमटवणारे सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म अहमदनगरमध्ये झाला होता. अमरापूरकर यांना शालेय जीवनापासूनच अभिनयात रस होता. पुणे विद्यापीठातून इतिहास विषयात एमए केल्यावर अमरापूरकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेली अर्धसत्य हा त्यांचा पहिला वहिला हिंदी सिनेमा. विशेष म्हणजे या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून हा पुरस्कार देण्यात आला होता. यानंतर १९९१ मध्ये सडक या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायक हा पुरस्कारही त्यांनी पटकावला. याशिवाय इश्क, आंखे, कुली नं १, गुप्त अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. रंगभूमीवरील हँड्स अप या नाटकातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

खलनायकासोबतच विनोदी आणि चरित्र भूमिकाही त्यांनी साकारल्या होत्या. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला बाँबे टॉकीज हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर अमरापूरकर यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनातही सहभाग घेतला. तसेच गेल्या वर्षी पाण्याची धुलीवंदनाच्या दिवशी पाण्याची नासाडी करणा-या मंडळींना रोखण्याचा प्रयत्न केल्याने अमरापूरकर यांना धमकी दिल्याची घटना घडली होती. 

अमरापूरकर यांना गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या संसर्गाने ग्रासले होते. यासाठी त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अमरापूरकर यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  अंत्यदर्शनासाठी अमरापूरकर यांचे पार्थिव सकाळी अकरा वाजता मुंबईतील भाईदास हॉल येथे आणले जाणार आहे. तर उद्या दुपारी चार वाजता अहमदनगर येथील मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

Web Title: Senior actor Sadashiv Amrapurkar Kalvash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.