ज्येष्ठ अभिनेते रघुवीर नेवरेकर काळाच्या पडद्याआड
By Admin | Updated: November 24, 2014 03:25 IST2014-11-24T03:25:36+5:302014-11-24T03:25:36+5:30
नाट्यसेवा हे व्रत म्हणून अंगीकारलेले आणि आयुष्यभर नाट्यक्षेत्राला वाहून घेतलेले ज्येष्ठ अभिनेते रघुवीर नेवरेकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.

ज्येष्ठ अभिनेते रघुवीर नेवरेकर काळाच्या पडद्याआड
मुंबई : नाट्यसेवा हे व्रत म्हणून अंगीकारलेले आणि आयुष्यभर नाट्यक्षेत्राला वाहून घेतलेले ज्येष्ठ अभिनेते रघुवीर नेवरेकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या ८ दिवसांपासून त्यांना शुश्रूषा रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी सकाळी १०च्या सुमारास त्यांचे निधन झाले. सोमवारी सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीवरील मागच्या पिढीतील ज्येष्ठ रंगकर्मी काळाच्या पडद्याआड गेला आहे.
मूळचे गोव्याचे असलेले रघुवीर नेवरेकर यांनी मुंबई गाठली आणि गिरगावच्या चिकित्सक शाळा व विल्सन महाविद्यालयात शिक्षण घेतले. पुढे गुजरातमध्ये कंपनीत ते मोठ्या हुद्द्यावर कार्यरत झाले. नाटकाच्या वेडापायी ते नोकरी सोडून १९७१मध्ये मुंबईत आले. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा जेव्हा सुरू झाली, तेव्हा सलग तिन्ही वर्षी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक पटकावले. धि गोवा हिंदू असोसिएशनच्या नाटकांतून त्यांनी केलेल्या भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतल्या आणि मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. दूरदर्शनवरील ‘श्वेतांबरा’ या मालिकेत त्यांनी रंगवलेली भूमिका अजरामर ठरली आणि या भूमिकेने त्यांची वेगळी ओळख रसिकांच्या मनात कायमस्वरूपी ठसली. (प्रतिनिधी)