मोबाइलवरून पाठवा खड्ड्यांचे छायाचित्र
By Admin | Updated: May 21, 2016 01:53 IST2016-05-21T01:53:38+5:302016-05-21T01:53:38+5:30
गेली पाच वर्षे प्रभावी ठरलेल्या पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीमचे कंत्राट संपल्यामुळे पालिकेने आता मोबाइल अॅप आणण्याची तयारी केली आहे़

मोबाइलवरून पाठवा खड्ड्यांचे छायाचित्र
मुंबई : खड्डे शोधण्यासाठी गेली पाच वर्षे प्रभावी ठरलेल्या पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीमचे कंत्राट संपल्यामुळे पालिकेने आता मोबाइल अॅप आणण्याची तयारी केली आहे़ त्यानुसार १ जूनपासून मुंबईकर आपल्या विभागातील खड्ड्यांचे छायाचित्र काढून अॅपद्वारे विभाग कार्यालयापर्यंत पोहोचवू शकतील़
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जाते़ हे खड्डे पालिका बुजवत असली तरी छोट्या रस्त्यांवरील खड्डे दुर्लक्षितच राहतात़ त्यामुळे २०११ मध्ये पालिकेने पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीम आणली़ त्यानुसार खड्ड्यांचे छायाचित्र मोबाइलवरून काढून थेट या संकेतस्थळावर पाठविणे शक्य होत होते़ खड्डे शोधण्याच्या या अनोख्या मोहिमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता़
या संकेतस्थळावर वरिष्ठांचे लक्ष असल्यामुळे ४८ तासांमध्ये खड्डे बुजविण्याची खबरदारी अभियंते घेत होते़ मात्र १ एप्रिल २०१६ पासून या संकेतस्थळाचे कंत्राट संपले़ ही मोहीम प्रभावी असल्याने अखेर पालिका प्रशासन अॅपद्वारे खड्डे शोध मोहिमेला पुनरुज्जीवित करणार आहे. त्याचप्रमाणे खड्डे बुजविण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली़ (प्रतिनिधी)
>अॅपचा वापर असा होईल
अॅपल किंवा अॅण्ड्रॉइड मोबाइलवरून नागरिकांनी त्यांच्या विभागातील खड्ड्यांचे छायाचित्र काढावे़ हे छायाचित्र जीपीएसद्वारे संबंधित विभाग कार्यालयांकडे पोहोचेल़
मात्र छायाचित्र दहिसरमध्ये काढून मालाडमध्ये आल्यानंतर पाठविण्याचा प्रयत्न केल्यास ते छायाचित्र जाणार नाही़ या अॅपवर सध्या संशोधन वेगात सुरू आहे़
खड्डे कमी झाले़़़
दोन वर्षांपूर्वी मुंबईत ४० हजार खड्ड्यांची नोंद झाली होती़ मात्र खड्डे त्वरित भरण्यात येत असल्याने तसेच रस्त्यांची नियमित डागडुजी व रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने गेल्या वर्षी केवळ ६ हजार खड्डे आढळून आले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे़