सेनेचे देवळेकर केडीएमसीचे महापौर
By Admin | Updated: November 12, 2015 03:28 IST2015-11-12T03:28:27+5:302015-11-12T03:28:27+5:30
कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी, तर भाजपाचे विक्रांत तरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली

सेनेचे देवळेकर केडीएमसीचे महापौर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी, तर भाजपाचे विक्रांत तरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. शिवसेना आणि भाजपाच्या युतीमुळे शिवसेनेचा महापौरपदाचा मार्ग आधीच मोकळा झाला होता. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक या वेळी अनुपस्थित राहिले.
महापालिकेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलेल्या सेना-भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने नाइलाजास्तव त्यांनी युतीचा मार्ग अवलंबला आहे.
निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेस महापौर आणि उपमहापौरपदासाठी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्यात आले होते. वाटाघाटीत महापौरपद पहिल्यांदा शिवसेनेकडे देण्याचा निर्णय झाला. या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने उपस्थित होते. दुपारी १२ वाजता निवडणुकीला प्रारंभ झाला. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत सर्वांचे अर्ज वैध ठरल्याचे त्यांनी जाहीर केले.
प्रथम महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार राहुल दामले यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिवसेनेच्या देवळेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात येताच शिवसेना नगरसेवकांकडून एकच जल्लोष करण्यात आला. यानंतर, उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी भाजपकडून विक्रांत तरे आणि विशाल पावशे यांनी तर शिवसेनेकडून राजेश मोरे यांनी उमेदवारी दाखल केली होती. उपमहापौरपद भाजपला देण्याचा निर्णय झाल्याने शिवसेनेचे मोरे यांनी माघार घेतली. तर, भाजपच्या पावशे यांनीही
उमेदवारी मागे घेतल्याने तरे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
या वेळी शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे, आमदार सुभाष भोईर, भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, रवींद्र चव्हाण आदींनी व्हीआयपी कक्षात हजेरी लावली होती. देवळेकर आणि तरे यांची निवड होताच मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. निवडणुकीच्या वेळी अनुपस्थित राहणाऱ्या मनसे नगरसेवकांनीही सभागृहात जाऊन दोघांचे अभिनंदन केले. अनुपस्थितीबाबत विचारणा केली असता आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका आधीच स्पष्ट केली होती, असे मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)