सेनेचा मोदींबाबतच्या भूमिकेचा घोळ कायम
By Admin | Updated: October 16, 2014 05:01 IST2014-10-16T05:01:16+5:302014-10-16T05:01:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करायचे किंवा कसे याबाबत शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मनातील घोळ निवडणुकीच्या अखेरपर्यंत कायम राहिला

सेनेचा मोदींबाबतच्या भूमिकेचा घोळ कायम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करायचे किंवा कसे याबाबत शिवसेनेच्या नेतृत्वाच्या मनातील घोळ निवडणुकीच्या अखेरपर्यंत कायम राहिला. मोदींवर टीका करायची आहे; मात्र त्याच्या परिणामांबाबत नेमका अंदाज येत नाही अशा द्विधा मन:स्थितीत शिवसेना गुरफटल्याचे दिसून आले.
शिवसेना-भाजपा युती तुटली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करायचे नाही. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना धारेवर धरायचे, असे राजकीय धोरण ठरले होते. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपत्राला मुलाखत देऊन ‘चहावाला पीएम होऊ शकतात तर मी सीएम का होऊ शकत नाही’, अशी शेरेबाजी केली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी मोदींच्या ‘चहावाला’ असण्याबाबत उल्लेख केला होता. शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव यांच्या या टीकेचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर रात्री उशिरा मोदींचा ‘चहावालाह्ण हा उल्लेख ठेवायचा की काढून टाकायचा यावरून शिवसेनेत बराच खल सुरु होता. अखेरीस मथळ््यातील ‘चहावालाह्ण हा उल्लेख काढून मुलाखतीच्या एका उत्तरातील उल्लेख ठेवला गेला. शिवसेना नेतृत्वाने मोदींवर अशी टीका केली तर ते आपल्या पथ्यावर पडेल, असे भाजपाच्या नेत्यांना वाटत होते.
त्याचवेळी शिवसेनेच्या हिंदी मुखपत्रातील एका स्तंभामध्ये मोदींच्या वडिलांचा अनुदाराने उल्लेख केला गेला. त्याच्याशी आपला संबंध नसून मोदी यांच्याबद्दल आपल्याला आजही आदर आहे, असा खुलासा शिवसेना नेतृत्वाने मंगळवारी दुपारी केला होता. त्यानंतर त्या स्तंभ लेखकाने सर्व जबाबदारी आपली असल्याचे स्पष्ट करून शिवसेना नेतृत्वाची सुटका केली. त्यानंतर लागलीच नवा घोळ सुरु झाला. मोदींवर टीका करायची तर आहे. मात्र त्याचे बुधवारी होणाऱ्या मतदानावर काय परिणाम होतील, याचा अंदाज येत नाही अशा गोंधळात शिवसेना नेतृत्व निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सापडल्याचे दिसले.