एमआयएमबाबत सेनेची गुपचिळी

By Admin | Updated: April 4, 2015 04:50 IST2015-04-04T04:50:30+5:302015-04-04T04:50:30+5:30

पुणे येथील असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला कडाडून विरोध करणारी, निदर्शने करणारी शिवसेना कलानगर येथील ‘मातोश्री’च्या अंगणात येऊन

Sena's confusion about MIM | एमआयएमबाबत सेनेची गुपचिळी

एमआयएमबाबत सेनेची गुपचिळी

मुंबई : पुणे येथील असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला कडाडून विरोध करणारी, निदर्शने करणारी शिवसेना कलानगर येथील ‘मातोश्री’च्या अंगणात येऊन विखारी भाषेत बोलणाऱ्या ओवेसीबंधूंबाबत गप्प आहे. विशेष म्हणजे ओवेसीबंधू वांद्रे(पूर्व) पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेला टीकेचे लक्ष्य करीत नसून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस यांना लक्ष्य करीत आहेत.
पुणे येथे काही दिवसांपूर्वी असादुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी शिवसेनेने ही सभा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलन केले. त्यामुळे अखेरीस बंद सभागृहात ओवेसी यांना सभा घ्यावी लागली. वांद्रे (पू.) पोटनिवडणुकीत एमआयएमने राजा सिराज रेहबारखान यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या प्रचाराकरिता नौपाडा, बेहरामपाडा या परिसरात अगदी मातोश्रीच्या अंगणात ओवेसीबंधूंच्या जाहीर सभा होत आहेत. या सभांमध्ये हे दोघे तिखट भाषेत भाजपा, काँग्रेसवर टीका करीत आहेत. ही बाब शिवसेनेला गुदगुल्या करणारी व पथ्यावर पडणारी असल्याने शिवसेना थंड असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी एमआयएमने सुरू केली असून, किमान २० ते २५ नगरसेवक निवडून आणण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. १९९२ साली बाबरी मशीद पडल्यावर व मुंबईत दंगे झाल्यावर १९९७ साली झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे मुंबई महापालिकेत २१ नगरसेवक निवडून गेले होते. त्याचवेळी महापालिकेतील काँग्रेसची सत्ता घालवणाऱ्या शिवसेनेलाही बहुमत प्राप्त झाले होते. एमआयएमच्या मुंबईतील कार्यालयाचे भायखळा येथे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्या वेळी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी व अकबरुद्दीन ओवेसी उपस्थित होते. मुंबईतील मुस्लीमबहुल विभागात महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने लक्ष केंद्रित करण्याचे एमआयएमने ठरवले आहे. एमआयएम महापालिका निवडणुकीत आक्रमक झाली तर शिवसेनाही जहाल भूमिका घेण्याची अथवा परस्परपूरक राजकारण करण्याची शक्यता आहे.

Web Title: Sena's confusion about MIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.