शिवसेना सत्तेसाठी लाचार : राणेंची टीका
By Admin | Updated: November 24, 2014 00:13 IST2014-11-24T00:11:40+5:302014-11-24T00:13:02+5:30
नेतृत्वाची क्षमता नाही : पक्षात फूट पडू नये यासाठीच सत्तेत जाण्याचा विचार

शिवसेना सत्तेसाठी लाचार : राणेंची टीका
कणकवली : शिवसेनेला कोकणातील जनतेने ताकद दिली, असे सांगणाऱ्या शिवसेना नेत्यांनी नेहमीच कोकणी माणसाची फसवणूक केली आहे. सत्तेसाठी स्वत: लाचार असलेले दुसऱ्याला काहीही देऊ शकणार नाहीत. पक्षात फूट पडू नये यासाठीच सत्तेत जाण्याचा विचार शिवसेना नेतृत्व करीत असून, पक्ष टिकविण्याची क्षमता त्यांच्यात राहिलेली नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली.
येथील ओमगणेश निवासस्थानी आज, रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमान शिकविला; मात्र आताच्या शिवसेनेच्या नेतृत्वात हा स्वाभिमान राहिलेला नाही. लाचारी रक्तात असेल तर ती बाहेरही दिसतेच. विरोधी पक्ष म्हणून सत्तेबाहेर बसायचे एवढे धाडस शिवसेना नेतृत्वात राहिलेले नाही. शिवसेना मराठीच्या मुद्द्यासाठी तसेच हिंदुत्वासाठी नाही, तर ‘मातोश्री’च्या तसेच मूठभर आमदार, खासदारांच्या उदरनिर्वाहासाठी आता उरली आहे. जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम राहील, असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंमध्ये या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठणकावण्याची ताकद नाही.
जैतापूर प्रकल्पाचे काम सुरू असून, ते पूर्ण होणारच आहे. त्यामुळे यांच्या विरोधाला कोण विचारतो? अशी स्थिती आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेचे नेते जेव्हा कोकणात येतात, तेव्हा येथील निसर्ग चांगला आहे, येथील जनता आमच्यावर प्रेम करते, असे सांगत असतात. मात्र, कोकणी माणसाला काय दिले? त्यांच्या विकासात शिवसेनेचे योगदान काय? याबाबत बोलत नाहीत.
उद्योगधंदे तसेच प्रकल्पांना विरोध करणाऱ्या शिवसेनेला बेकार तरुणांना रोजगार कोण देणार, हे समजत नाही. फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळाले की त्यांचा विरोध मावळतो. पर्यटक म्हणून शिवसेनेचे कार्याध्यक्ष कोकणात येऊन गेले.
सासुरवाडीची आठवण बऱ्याच वर्षांनी जावयांना झाली; पण जावयांनी सासुरवाडीला आतापर्यंत विकासात्मक काय दिले? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
शिवसेनेच्या एकाही आमदारात मंत्री होण्याची गुणवत्ता नाही, तसेच मंत्रिपद हाताळण्याची क्षमता नाही. त्यामुळे सत्तेत गेले तरी ही मंडळी कोकणचा विकास करू शकणार नाहीत.
काँग्रेसचा मी एक कार्यकर्ता असून, कोकणात मी कुठेही फिरू शकतो. विधानसभा निवडणुकीनंतर मी कोकणातील माझ्या घरी आलो आहे, सासुरवाडीला नाही. जोपर्यंत येथील जनतेचे प्रेम माझ्यावर आहे, तोपर्यंत मी राजकारणात सक्रिय राहीन.
राजकारण हे माझ्या उदरनिर्वाहाचे साधन नाही. गेली २५ वर्षे सिंधुदुर्ग तसेच कोकण प्रदेश आपला आहे या भावनेतून येथील विकास करण्याचा प्रयत्न केला.
विधायक, सामाजिक, शैक्षणिक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले. विकासकामांसाठी निधी खेचून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव हा माझा आहे. पक्षाचा अथवा कार्यकर्त्यांचा नाही. ज्यांनी मला मते दिली व ज्यांनी दिली नाहीत, त्यांचेही मी आभार मानतो, असेही राणे म्हणाले.
शासनाला मराठा आरक्षण द्यावेच लागेल
मराठा आरक्षण नियमात बसवून दिले आहे. शासनाला ते द्यावेच लागेल. राज्यातील मराठा समाज रस्त्यावर आला तर शासनाला त्यांना सांभाळणे कठीण जाईल. आतापर्यंत मराठ्यांनी मराठापण दाखवून दिलेले नाही. शासन आरक्षणाबाबत बाजू मांडायला कमी पडले आहे. त्यांना उच्च न्यायालयात या प्रश्नी जावेच लागेल, असेही राणे म्हणाले.
काँगे्रसच्या राज्यात अस्थिरता नव्हती
अच्छे दिन येणार, असे सांगणाऱ्या भाजपच्या राज्यात अस्थिरता आहे; परंतु काँगे्रसच्या राज्यात ती कधीही नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या बचावासाठीच भाजपला पाठिंबा देत आहे, जनतेसाठी नव्हे, असेही राणे म्हणाले.
राज्य दिवाळखोरीत नाही
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी कोणतेही वक्तव्य करण्याआधी माहिती घ्यावी. महाराष्ट्र नव्हे, तर गुजरातच दिवाळखोरीत आहे. गुजरातचा जीडीपी २६ टक्के आहे. तो २८ टक्क्यांवर गेला तर ते निश्चितच दिवाळखोरीत जाईल. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची क्षमता आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत आहे, असेही राणे म्हणाले.