सेना-भाजप बेदिलीचा इतर पक्षांना लाभ?
By Admin | Updated: October 20, 2016 01:50 IST2016-10-20T01:50:49+5:302016-10-20T01:50:49+5:30
भाजपाचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुलुंडमध्ये येत्या पालिका निवडणुकीत सत्तेतील मित्रपक्षासोबत दोन हात करावे लागणार आहेत.

सेना-भाजप बेदिलीचा इतर पक्षांना लाभ?
मुंबई : भाजपाचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुलुंडमध्ये येत्या पालिका निवडणुकीत सत्तेतील मित्रपक्षासोबत दोन हात करावे लागणार आहेत. याची सुरुवात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर झालेल्या पालिकेच्या भ्रष्टाचाररूपी रावण दहनावरून झाली आहे. याचाच फायदा उचलून दोघांच्या भांडणात राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेस यांनी आपली पोळी भाजून घेण्यास सुरुवात केली आहे.
मुलुंड पश्चिमेकडील मुलुंड कॉलनी, शंकर टेकडी अशी काही डोंगराळ भागातील झोपडपट्टी सोडल्यास टोलेजंग इमारतींनी हा परिसर व्यापला आहे. जवळपास पावणेचार लाखांची लोकसंख्या असलेल्या मुलुंडमध्ये गुजराती भाषिक अधिक आहेत. तर मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनी, गव्हाणपाडा, नाणेपाडा अशा मराठी वस्तीचा यात समावेश आहे. नवीन वॉर्ड रचनेमुळे कुठे खुशी कुठे गमचे चित्र पाहावयास मिळते. त्यातच पक्षांतर्गतच युद्ध पेटल्याने यात आणखीनच रंग चढत आहे.
मुलुंड हे उपनगर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडून आहे. शिवाय पूर्व उपनगरातील कालिदास नाट्यगृह याच परिसरात आहे. तर मुलुंड, भांडुप, कांजूरमधील रहिवाशांसाठी असलेले अग्रवाल रुग्णालयही याच भागात आहे. अशी महत्त्वपूर्ण ठिकाणे असलेल्या मुलुंडमध्ये सध्या हरिरोम नगर डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा मुद्दा घेऊन नेतेमंडळीच्या श्रेय लाटण्याचे राजकारणही दिसून येत आहे. तर काही जण पश्चिमेकडील वन विभागाच्या मुद्द्याचा वापर निवडणुकीत करणार आहे. याव्यतिरिक्त झोपडपट्टी पुनर्वसन, रस्ते, नाले, पाणी यादेखील प्रमुख समस्या आहेत. त्यामुळे अशात नगरसेवकासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली आहे.
मुलुंडमधील सहा प्रभागांपैकी १०५ आणि १०७ हा महिलांसाठी खुला झाला आहे. तर १०३, १०६ आणि १०८ हा सर्वसाधारण खुला झाला असून १०४ हा इतर मागासवर्गीय (ओबीसी) झाल्याने सर्वांचीच पळापळ सुरू आहे. मुलुंडमध्ये भाजपा आमदार सरदार तारासिंग यांची याच भागात आमदारकीची चौथी वेळ आहे. अशात भाजपाचे मनोज कोटक, प्रकाश गंगाधरे, समीता कांबळे हे तीन नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादीचे नंदकुमार वैती, मीनाक्षी सुरेश पाटील, मनसे नगरसेविका सुजाता पाठक आहेत. अशात नवीन वॉर्ड रचनेमुळे वैती आणि गंगाधरे यांचा वॉर्ड महिला झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. गंगाधरे १०४ मधून तर वैती १०६ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर नव्याने तयार झालेल्या १०३ वॉर्डमधून भाजपा नगरसेवक मनोज कोटक यांनी फिल्डिंग लावली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गुजराती वर्गाबरोबरच उच्चभ्रू लोकवस्तीचा भरणा आहे. मात्र अखेर पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र जर पक्षाने उभे केले नाही तर अनेक जण बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
>या वेळी शिवसेना-भाजपामध्ये रावण दहनावरून सुरू असलेल्या वादाचा तणाव निवडणुकीत रंगणार आहे. सेनेचा वडापाव हातून गेल्याने भाजपा कार्यकर्त्यांना जिलेबी-फाफड्याबरोबरच बिर्याणीचे बेत आखण्यासाठी आर्थिक गणित मांडले जात आहे. आतापासून त्यांनी रिपाइंच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरले आहे. मतदारांना खूश करण्यासाठी हिशोबांची मांडणीही सुरू केली आहे. त्यामुळे मुलुंडमध्ये तरी निवडणुकीत पैशांच्या पावसात उमेदवार, कार्यकर्ते यांना ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
>प्रभाग क्रमांक - १०३
आरक्षणखुला
एकूण लोकसंख्या - ६१०७१
अनुसूचित जाती - ३१५३
अनुसूचित जमाती - ९५६
व्याप्ती - भांडुप कॉम्प्लेक्स, विहार लेक, वीणानगर, घाटीपाडा
>प्रभाग क्रमांक - १०४
आरक्षणइतर मागासवर्गीय
एकूण लोकसंख्या - ५९०९७
अनुसूचित जाती - ५५९१
अनुसूचित जमाती - ११६७
व्याप्ती - तांबेनगर, इंदिरानगर, सिद्धार्थनगर
>प्रभाग क्रमांक - १०५
आरक्षणखुला (महिला)
एकूण लोकसंख्या - ५२९६२
अनुसूचित जाती - २४८५
अनुसूचित जमाती - १२८८
व्याप्ती - डॉ. आंबेडकरनगर, नीलमनगर, सज्जनवाडी, पाटीलनगर, गव्हाणपाडा
>प्रभाग क्रमांक - १०६
आरक्षणखुला
एकूण लोकसंख्या - ४९९५६
अनुसूचित जाती - २७०७
अनुसूचित जमाती - १२९७
व्याप्ती - हरी ओमनगर, म्हाडा कॉलनी, डम्पिंग सॉल्ट लेक, टाटा कॉलनी, नवघर
>प्रभाग क्रमांक - १०७
आरक्षणखुला (महिला)
एकूण लोकसंख्या - ६१२३५
अनुसूचित जाती - २०४६
अनुसूचित जमाती - १०७८
व्याप्ती - नाहूर गावठाण, मुलुंड बेस्ट बस डेपो, सेंट पायस कॉलनी
>प्रभाग क्रमांक - १०८
आरक्षणखुला
एकूण लोकसंख्या- ५७१४२
अनुसूचित जाती - ७२३२
अनुसूचित जमाती - १०९८
व्याप्ती - राहुलनगर, मोतीनगर, हनुमानपाडा, आशानगर२
>२०१२ मधील विजयी आणि पराभूत उमेदवार (जुन्या रचनेनुसार)
वॉर्ड क्र.९८
विजयी उमेदवार-
समीता कांबळे (भाजपा)- ८३६५
पराभूत- नंदा प्रभाकर कांबळे
(काँग्रेस) - ७९८०
वॉर्ड क्र.९९
विजयी उमेदवार
भावना जोबनपुत्रा (भाजपा)-९२७५
पराभूत, मीनाक्षी सुरेश पाटील
(राष्ट्रवादी) - ८५०१
(दरम्यान बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी भावना जोबनपुत्रा अपात्र ठरल्या)
वॉर्ड क्र.१००
विजयी उमेदवार
नंदकुमार वैती : (राष्ट्रवादी) - ९१२६
पराभूत : सत्यवान दळवी
(मनसे) -८८१०
वॉर्ड क्र.१०१
विजयी उमेदवार
सुजाता पाठक (मनसे) -९७२०
पराभूत : ज्योती वैती (सेना) -८८१४
वॉर्ड क्र.१०२
विजयी उमेदवार
प्रकाश गंगाधरे (भाजपा) - १०५५०
पराभूत : उत्तम गिते (काँग्रेस)- ८६२३
वॉर्ड क्र.१०३
विजयी उमेदवार
मनोज कोटक (भाजपा) - ९३०२
पराभूत- जयप्रकाश शेट्टी (काँग्रेस) -७४७४