चोरलेल्या दुचाकींची फक्त १०० रुपयात विक्री,पुण्याचा चोरटा ताब्यात
By Admin | Updated: January 12, 2017 23:49 IST2017-01-12T23:49:11+5:302017-01-12T23:49:11+5:30
दुचाकी चोरीत अट्टल असलेल्या चोरट्यास जळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली.

चोरलेल्या दुचाकींची फक्त १०० रुपयात विक्री,पुण्याचा चोरटा ताब्यात
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 12- दुचाकी चोरीत अट्टल असलेल्या समाधान गोकुळ सपकाळे (वय २८ रा.हडपसर, पुणे, मुळ रा.फुपणी,ता. जळगाव) या चोरट्यास जळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे शिवाजीनगरातून अटक केली. त्याने आतापर्यंत सुमारे २५ दुचाकी चोरल्या असून त्याची फक्त १०० ते २०० रुपयात विक्री केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
नवी पेठेतील राठी ट्रेडर्स या दुकानाजवळून १० जानेवारी रोजी रात्री दहा वाजता लक्ष्मीकांत योगेश राठी यांच्या मालकीची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.आर.११९९) चोरी झाली होती. शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले असता पुणे कारागृहातून एक अट्टल चोरटा बाहेर आला आहे व तो सध्या जळगाव जिल्ह्यात वावरत असल्याची माहिती कॉन्स्टेबल प्रितम पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी गुन्हे पथकाचे सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, सुनील पाटील, दुष्यंत खैरनार, संजय शेलार व अमोल विसपुते यांचे पथक तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. सपकाळे हा शिवाजीनगरात नातेवाईकाकडे आहे व त्याच्याजवळ राठी यांच्या मालकीची दुचाकी असल्याचे समजताच पथकाने पहाटे अडीच वाजता त्याला नातेवाईकाच्या घरी घेरले.
पोलिसांचे मोबाईल चोरले-
सपकाळे याच्यावर हडपसर, पुणे येथे दुचाकीचे चोरीचे आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत. तेथील पोलिसांच्या ताब्यात असताना गुन्हे पथकाच्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल व कपाटातील साहित्यही त्याने चोरले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.