गांजा विक्रेता करतोय देवभक्त असल्याचे नाटक

By Admin | Updated: July 31, 2016 02:16 IST2016-07-31T02:16:55+5:302016-07-31T02:16:55+5:30

एपीएमसीमध्ये सर्वात मोठा गांजा विक्रीचा अड्डा चालविणाऱ्या राजाने देवभक्त असल्याचे भासवून मार्केटमध्ये बस्तान बसविले आहे.

The seller of ganja is pretending to be a godfather | गांजा विक्रेता करतोय देवभक्त असल्याचे नाटक

गांजा विक्रेता करतोय देवभक्त असल्याचे नाटक

नामदेव मोरे,

नवी मुंबई- एपीएमसीमध्ये सर्वात मोठा गांजा विक्रीचा अड्डा चालविणाऱ्या राजाने देवभक्त असल्याचे भासवून मार्केटमध्ये बस्तान बसविले आहे. त्याने मंदिर परिसरालाच गांजा विक्रीचे केंद्र बनविले आहे. देवभक्त असल्याचे भासविणारा गांजा विक्रेता वर्षातून एकदा भंडाऱ्याचे आयोजन करून पूर्ण मार्केटसाठी जेवणाची व्यवस्था करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात खुले आम सुरू असणाऱ्या गांजा विक्रीच्या अड्ड्यांचा ‘लोकमत’ने भांडाफोड केल्यानंतर नागरिकही गांजा विक्रेत्यांविषयी उघडपणे बोलू लागले आहेत. नेरूळ नाही तर एपीएमसीमध्येच सर्वाधिक गांजाची विक्री होत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. जवळपास तीन ठिकाणी गांजाची विक्री होत असून, त्यामध्ये भाजी मार्केटबाहेरील सार्वजनिक शौचालय व फळ मार्केटच्या मागील बाजूला असणाऱ्या मंदिर परिसराचा समावेश आहे. फळ मार्केटमध्ये राजा नावाची व्यक्ती हा अड्डा चालवत आहे. यापूर्वीही त्याच्यावर अमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू केल्यानंतर काही महिने राजाचा अड्डा बंद झाला होता. परंतु आता पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा गांजाची विक्री सुरू केली आहे. एपीएमसीमधील फळांच्या पेटीतील गवत गोळा करून त्याची व्रिकी करण्याचा व्यवसाय तो करीत आहे. येथील मंदिरामध्ये तासन्तास पूजा करीत असल्याचे चित्रही पाहावयास मिळते. देवभक्त असल्याचे भासवून या परिसरातील नागरिकांची सहानुभूती मिळविण्यात त्याने यश मिळविले आहे. पूजेच्या बहाण्याने राजा व त्याचे साथीदार दिवसभर मंदिर परिसरात व समोरील गाळ्यामध्ये बसलेले असतात.
एपीएमसीच्या सुरक्षारक्षकांनी यापूर्वीही त्याला मार्केटमध्ये येण्यास मनाई केली होती. काही महिन्यांपूर्वी त्याने सुरक्षारक्षकालाच मारहाण केल्याची घटनाही घडली होती. यानंतर येथील उपसचिव व बाजार समिती अधिकारी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सीताराम कावरके यांनीही त्याला पुन्हा मार्केटमध्ये आल्यास कारवाईचा इशारा दिला होता. परंतु यानंतर काही दिवस गायब होऊन पुन्हा तो मार्केटमध्ये हजर झाला आहे. वर्षातून एकदा येथील कष्ट भंजन महादेव मंदिरामध्ये मोठा उत्सव भरविला जातो. या उत्सवाचा सर्व खर्च राजा व त्याचे सहकारी करतात. पूर्ण मार्केटला जेवण दिले जाते. याशिवाय एपीएमसीमधील इतरही काही उत्सवांना मोठ्या देणग्या देत असल्याची चर्चा आहे.
गांजा विक्रीतून मिळालेल्या पैशातून देवासाठी खर्च करायचा व सहानुभूती मिळविण्याची त्याची कार्यपद्धत असल्याचे मार्केटमधील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मार्केटच्या बाहेर एसटी महामंडळाचा डेपो आहे. या डेपोतील प्रसाधनगृहाच्या देखभालीचे काम घेतले आहे. याशिवाय त्याचा साथीदार पप्प्या हा मार्केटमध्ये एक प्रसाधनगृहाची देखभाल करीत आहे. प्रसाधनगृहांचा वापर गांजाचा साठा करण्यासाठी केला जात आहे. ग्राहकांना जसे लागेल त्या पद्धतीने तेथून गांजाच्या पुड्या आणल्या जात होत्या.
।कारवाईची मागणी
एपीएमसीमध्ये गांजा विक्री करणारा राजा, त्याचा साथीदार पप्प्या, याशिवाय काही दिवसांपासून गांजा व्रिकीच्या अड्ड्यावर एक अपंग व्यक्ती बसत आहे. मार्केट आवारामध्ये मंदिराजवळ व गेटच्या बाहेर दिवसभर बसून असलेल्या गांजा विक्रेत्याची माहिती मार्केटमधील सर्वांना आहे. पूर्ण नवी मुंबईमधून गांजा खरेदीसाठी तरुण येथे येत असतात. सर्वांना माहिती असणाऱ्या या अड्ड्याविषयी पोलिसांना माहिती नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात असून पोलिसांना सर्व माहिती आहे; पण ते दुर्लक्ष करीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Web Title: The seller of ganja is pretending to be a godfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.