स्वाभिमानी संघटना तोंडघशी

By Admin | Updated: September 25, 2014 01:14 IST2014-09-25T01:11:29+5:302014-09-25T01:14:21+5:30

लढण्यापूर्वीच झटका : शिवसेना-भाजप युतीलाही बसणार फटका

The self-respecting organization faces the face | स्वाभिमानी संघटना तोंडघशी

स्वाभिमानी संघटना तोंडघशी

विश्वास पाटील - कोल्हापूर -महायुतीत शिवसेना-भाजप या प्रमुख पक्षांनीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतरही घटकपक्षांना पुरेशा जागा न दिल्याने हे घटकपक्ष महायुतीतून बाहेर पडले. त्यामुळे संघटनेला चांगलाच झटका बसला असून, या घडामोडींमध्ये संघटना तोंडघशी पडल्याचे चित्र पुढे आले आहे. महायुती आकारास यावी यासाठी ज्यांचे योगदान राहिले, त्यांनाच घराबाहेर पडण्याची वेळ आल्याचा अनुभव यानिमित्ताने खासदार राजू शेट्टी यांना आला आहे. ‘स्वाभिमानी’सह राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पक्ष (आठवले) गट यांच्या दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय ताकदीचा विचार केल्यास किमान २१ जागांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, म्हणजे या ठिकाणच्या लढती महायुतीला जड जाऊ शकतात.
जरी आज, बुधवारी सायंकाळपर्यंत झालेल्या घडामोडींनुसार स्वाभिमानी संघटना महायुतीतून बाहेर पडली असली तरी अजूनही समझोता होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या सगळ्या पक्षांनी एकत्र यावे, असा जनतेचाच त्यांच्यावर दबाव आहे. ‘स्वाभिमानी’ महायुतीतून बाहेर पडल्यास त्याचा त्यांना जसा फटका बसणार आहे, तसा तो शिवसेना-भाजपलाही नक्कीच बसणार आहे. शिवसेना व भाजपची राज्यात १९९० पासून युती होती. युतीला महायुती करण्यात या तीन पक्षांचे पाठबळ नक्कीच महत्त्वाचे होते. युतीचा पाया ग्रामीण महाराष्ट्रात विस्तारण्याचे काम इतर तीन पक्षांमुळे होणार होते, हे ध्यानात आल्यानेच स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी शेट्टी, महादेव जानकर व रामदास आठवले यांना बरोबरीने घेतले. त्याचा लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलाच फायदा झाला. मुंडे यांच्यामुळेच ही युती आकारली. त्यामुळे ते असेपर्यंत घटक पक्षांत चांगला समन्वय होता. परंतु, त्यांचे निधन झाले व लोकसभेला मोदी लाटेमुळे दणदणीत विजय मिळाल्यावर दोन प्रमुख पक्षांना घटकपक्षांची गरज वाटेनाशी झाली. आताही घटकपक्षांना जास्त जागा द्यायला लागू नयेत, असाच कावा होता हे स्पष्ट होत आहे.
या घडामोडींत शेट्टी यांची जास्त पंचाईत झाली. कारण मुळातच ते जेव्हा भाजपच्या आघाडीत सहभागी झाले, तेव्हा त्यांच्यावर चोहोबाजूंनी कडाडून टीका झाली. शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी हे भाजपमध्ये गेल्यावर स्वतंत्र संघटना काढणारे पुन्हा त्याच वाटेने गेल्याची टीका झाली; परंतु शेट्टी यांनी व्यक्तिगत करिष्म्याने त्यावर मात केली. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल या भावनेने त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. महायुती व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील राहिले; परंतु झाले उलटेच. संघटनेची आतापर्यंतची सगळी वाटचाल स्वबळावर झाली आहे हे खरे असले तरी शेट्टी खासदार झाल्यानंतर संघटनेला दक्षिण महाराष्ट्रात एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. आता कार्यकर्त्यांना आमदारकीचा गुलाल देण्याची संधी आली असताना महायुतीतून अपमानास्पदरीत्या बाहेर पडावे लागणार असल्याने संघटनेलाही त्याचा फटका बसणार आहे.
‘स्वाभिमानी’सह तिन्ही प्रमुख घटकपक्ष स्वबळावर अपवाद वगळता एकही जागा निवडून आणू शकत नाहीत हे वास्तव असले तरी, ते युतीच्या उमेदवारांचा नक्कीच पराभव करू शकतात. गत निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेने या चार जिल्ह्यांत १४ जागा लढविल्या. त्यांच्या उमेदवारांना सरासरी १४ टक्के मते मिळाली आहेत, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील एकूण जागा --37

Web Title: The self-respecting organization faces the face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.