खड्डे बुजवण्याच्या नावाखाली चुना

By Admin | Updated: June 8, 2016 02:33 IST2016-06-08T02:33:23+5:302016-06-08T02:33:23+5:30

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सहा कोटी रुपये खर्च करणार आहे.

Selected for the name of the potholes | खड्डे बुजवण्याच्या नावाखाली चुना

खड्डे बुजवण्याच्या नावाखाली चुना


कल्याण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी सहा कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यासाठी महापालिकेने चार कंत्राटदार कंपन्यांना ही कामे विभागून दिली आहेत. मात्र, ती निकष व नियमानुसार होत नाहीत. त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या अधिकाऱ्याला कंत्राटदार वर्कआर्डर नसल्याचे सांगून वेठीस धरीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे खड्डे योग्य प्रकारे बुजविले गेलेले नाहीत. परिणामी सहा कोटींची रक्कम पहिल्या पावसाच्या पाण्यात वाहून जाणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. थातूरमातूर कामे करून बिले लाटण्याचा प्रयत्न कंत्राटदारांकडून होत आहे, असा आरोप होत आहे.
विधान परिषदेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सहा कोटी रुपयांच्या खर्चाची निविदा मंजूर करून घेतली. त्यानंतर चार कंत्राटदारांना खड्डे बुजविण्याचे काम विभागून देण्यात आले आहे. त्यानुसार त्यांनी खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील महापालिकेच्या ‘ह’ प्रभागात खड्डे बुजविणाऱ्या कंत्राटदाराकडून निकषानुसार खड्डे बुजविले जात नाहीत. ते बुजविण्यासाठी डब्लूबीएसकरून त्यावर डांबर टाकावे लागते. त्यानंतर सील कोट टाकून खड्डा बुजविला गेला पाहिजे, असे निविदेत नमूद आहे. मात्र कंत्राटदाराकडून थातूरमातूर काम केले जात आहे. ही बाब सत्ताधारी शिवसेनेचे स्वीकृत सदस्य विश्वनाथ राणे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. राणे यांनी यासंदर्भात आयुक्त ई. रवींद्रन आणि शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यावर रवींद्रन आणि कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. थातूरमातूर कामे बंद करावीत, असे आदेश संबंधितांनी दिली आहेत. या आदेशापश्चात अधिकारी वर्गाने जाऊन कंत्राटदाराला अयोग्य कामाविषयी विचारणा केली असता कंत्राटदाराने त्याला वर्कआॅर्डर कुठे दिली आहे, असा पवित्रा घेतला. तसेच निकृष्ट कामाविषयी स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे. २ जूनला कंत्राटदाराने काम सुरू केले होते. तक्रार करताच ४ जूनपासून खड्डे बुजविण्याचे काम बंद केले आहे. गेल्या चार दिवसांपासून काम बंद ठेवणाऱ्याला कंत्राटदाराला कामाची वर्कआॅर्डर नव्हती तर त्याने काम कशाच्या आधारे सुरू केले होते, असा वस्तूनिष्ट सवाल राणे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार काम न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ््या यादीत टाका, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
केवळ पावसाळ्यातच होते काम
केवळ पावसाळ्यातच होते काम
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठीच काँक्रिटचे रस्ते
२०१० मध्ये कल्याण-डोंंबिवलीतील रस्त्यांच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १०३ कोटी त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३०० कोटी, असा एकूण ४०३ कोटींचा निधी महापालिकेस दिला आहे. त्यातून महापालिकाने ४६ रस्ते काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले.
ते पाच वर्षांपासून सुरू असून, ८० टक्के झाले आहे. काँक्रिटीकरणामुळे डांबरीकरणाच्या कामात होणाऱ्या भ्रष्टाचाराला ब्रेक लागण्यास मदत होईल. त्यासाठी शहरातील सगळे रस्ते काँक्रिटीकरणाचे होणे आवश्यक आहे.

Web Title: Selected for the name of the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.