सोलापूरात कृष्णा खोरेच्या कार्यालयाची जप्ती
By Admin | Updated: October 20, 2016 04:54 IST2016-10-20T04:54:55+5:302016-10-20T04:54:55+5:30
न्यायालयाच्या आदेशान्वये भीमा कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांच्या कार्यालयातील फर्निचर जप्त करण्यात आले़

सोलापूरात कृष्णा खोरेच्या कार्यालयाची जप्ती
सोलापूर : ठेकेदाराची थकबाकी न दिल्याने सोलापूरातील कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या भीमा कालवा मंडळाच्या कार्यालयावर बुधवारी जप्तीची नामुष्की ओढावली़ न्यायालयाच्या आदेशान्वये भीमा कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांच्या कार्यालयातील फर्निचर जप्त करण्यात आले़
सोलापूरातील भारत कन्स्ट्रक्शनने जाहीर निविदाद्वारे कृष्णा खोरे विकास महामंडळाची विविध कामे केली होती. परंतु अनेकदा मागणी केल्यानंतरही बिले मिळाली नाहीत़ अखेर भारत कन्स्ट्रक्शनने जिल्हा न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने भारत कन्स्ट्रक्शनच्याबाजूने निर्णय देताना बिलापोटीच्या रकमेसाठी जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला़ या आदेशाला आव्हान देत कृष्णा खोरे विकास महामंडळाने उच्च न्यायालयात अपिल केले होते़ मात्र उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवत तातडीने थकबाकी अदा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी भारत कन्स्ट्रक्शनचे नंदकिशोर शहा, उपाध्यक्ष विजयसिंह बायस, रोखपाल स्वामिनाथ कोकणे हे न्यायालयाच्या बेलिफ आर.एम. तांडुरे, अशोक ससाणे यांना घेऊन भीमा कालवा मंडळाच्या कार्यालयात गेले. थकीत ८ कोटी ७५ लाखांपैकी न्यायालयाच्या आदेशानुसार किमान १० लाख रुपये द्यावेत, अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल असे अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांना सांगितले. हे प्रकरण न्यायालयात आहे अन् लगेच पैसे देणेही शक्य नसल्याचे कांबळे यांनी सांगितल्यानंतर अधीक्षक अभियंत्याच्या खुर्चीसह अन्य १० खुर्च्या, एक टेबल व दोन संगणक जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
>शासनाने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. अपिल सुरू असतानाच जप्तीची कारवाई झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
- राजकुमार कांबळे, अधीक्षक अभियंता भीमा कालवा
>५२ लाखांचे
साडेबारा कोटी झाले
उजनीच्या उजव्या कालव्याची खोदाई व भराव्याचे काम भारत कन्स्ट्रक्शनने घेतले होते. १९९५-९६ सालच्या कामाचे बिल ते मागत होते. पैसे मिळत नसल्याने त्यांनी बसून राहिलेल्या मशिनरी व अन्य बाबीवर झालेल्या खर्चापोटी साडेबारा कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. लाखाच्या कामाच्या बिलाबाबत तत्कालीन अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने खुर्ची जप्त होण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली.
>कंत्राटदारांची बिले न दिल्याने सोलापूरातील ‘सिंचन भवन ’ येथील कृष्णा खोरे विकास मंडळाच्या कार्यालयावर बुधवारी जप्तीची कारवाई झाली़ अधिक्षक अभियंतांच्या डोळ्यादेखत त्यांची खुर्ची नेण्यात आली़