‘महापालिका विकास आराखडा लादू पाहतेय!’
By Admin | Updated: July 31, 2016 01:50 IST2016-07-31T01:50:27+5:302016-07-31T01:50:27+5:30
मुंबई महानगरपालिका चुकीचा प्रस्तावित विकास नियोजन आराखडा मुंबईकरांवर जबरदस्तीने लादू पाहतेय

‘महापालिका विकास आराखडा लादू पाहतेय!’
मुंबई : मुंबई महानगरपालिका चुकीचा प्रस्तावित विकास नियोजन आराखडा मुंबईकरांवर जबरदस्तीने लादू पाहतेय, असा आरोप हमारा शहर मुंबई अभियान संस्थेने केला आहे. पालिकेच्या प्रस्तावित विकास नियोजन आराखड्याला हजारो सूचना आणि हरकती आल्या आहेत. मात्र त्यांचा आकडा कमी दर्शवून पालिका मुंबईकरांना अंधारात ठेवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार यांनी या वेळी केला आहे.
शेलार म्हणाले की, महापालिकेच्या विकास आराखड्यात बदल, सूचना आणि हरकती दर्शविणारे सुमारे ३० हजार अर्ज संस्थेने पाठविले आहेत. तरीही १० हजारांहून कमी अर्ज आल्याचे पालिका सांगते. या अर्जांची संख्या कमी दाखविण्यासाठी पालिकेने एका संस्थेने पाठविलेल्या हजारो अर्जांची गणती एक अर्ज म्हणून केली आहे.
या आराखड्यात लोकशाही पायदळी तुडवून पालिका आयुक्तांना राजाप्रमाणे एकाधिकार दिले जात असल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे. ते म्हणाले की, माजी आयुक्त सीताराम कुंटे यांनी वॉर्ड स्तरावर जनजागृती करून मुंबईकरांना प्रस्तावित आराखड्याविषयी माहिती दिली होती. याउलट सध्याच्या आयुक्तांकडून असा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. याउलट पालिका अभियंत्यांना विकास आराखडा समजून घेण्यासाठी खासगी संस्थेकडे पाठवते. त्यामुळे सुधारित आराखडा बिल्डरांसाठीच आहे. (प्रतिनिधी)