बदलते रंग पाहून सरडाही लाजला
By Admin | Updated: September 26, 2014 23:34 IST2014-09-26T22:07:50+5:302014-09-26T23:34:24+5:30
कोकण किनारा

बदलते रंग पाहून सरडाही लाजला
रा जकारण आता एका अतिशय वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. राज्यस्तरावर झालेल्या घडामोडींचे पडसाद आता जिल्हाच नाही तर गावपातळीपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. युती कुणामुळे तुटली आणि आघाडी कुणामुळे फुटली यातच ही निवडणूक रंगेल आणि पुढाऱ्यांचे खरे चेहरे समोर येतील. कुणाची ताकद किती आहे, कुठला पक्ष तळागाळापर्यंत पोहोचला आहे, कुठल्या पक्षाची धोरणे लोकांना पसंत आहेत, याची खरी तपासणी आताच्या निवडणुकीत होईल. आतापर्यंत जो-तो दुसऱ्याच्या नावाने खडे फोडत होता. आता प्रत्यक्षात स्वत:ची ताकद या राजकीय पक्षांना कळेल. नवरात्रात नऊ रंग आहेत. पण, त्यापेक्षा अधिक रंग आता राजकारणी दाखवू लागले आहेत. आता हे रंग बदलणं बघून सरडाही लाजेल.
उमेदवारी अर्ज भरण्याचा निम्मा कालावधी संपल्यानंतर गेले काही दिवस युती आणि आघाडीमधील चर्चेची गुऱ्हाळे पूर्ण झाली. या चर्चांनंतर पुढे आलेली माहिती काहीशी धक्कादायक होती. स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्राला स्थिर आणि विकासाचे सरकार देण्यासाठी एकत्र आलेली काँग्रेस आघाडी फुटली. स्वार्थासाठी किंवा खुर्चीसाठी नाही तर हिंदुत्त्वासाठी एकत्र आलेली शिवसेना-भाजपची युती आता तुटली आहे. लोकांची दिशाभूल करून खूर्ची मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या या राजकीय पक्षांच्या कोलांट्या उड्या आता सुरू असलेल्या घटनांमुळे सर्वसामान्य माणसांना चांगल्याच कळू लागल्या आहेत. समाज, विकास, राज्य, सुधारणा या सगळ्याशी राजकीय पक्षांचे काही देणेघेणे आहे, असं वाटत नाही. मी, माझं पद, माझी खूर्ची आणि माझा विकास यापलिकडे ते जात नाहीत, हेच आताच्या वातावरणावरून दिसत आहे. सतत एकमेकांविरुद्ध ओडणारे, एकमेकांवर टीका करणारे आता इकडून-तिकडे जात आहेत. त्यामुळे कसली धोरणे आणि कसली नीतीमत्ता असा प्रश्न आता सामान्य माणसासमोर उभा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. आघाडी आणि युती यांनी स्वतंत्र लढण्याचे ठरवल्यानंतर जिल्ह्यात प्रमुख लढत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्येच होईल, असे चित्र आतापर्यंत दिसत होते. पण, आता प्रत्येक क्षणाला नवी राजकारणे तयार होत आहेत. त्यामुळे नेमकी लढत कोणा-कोणात होईल, हे सांगताच येत नाही. एका बातमीचा धक्का पचवण्याआधीच दुसरा धक्का देणाऱ्या बातम्या थडकू लागल्या आहेत.
निवडणुकीआधी पक्षप्रवेशाच्या घटना आताच घडत आहेत, असं नाही. दर निवडणुकीत असं वातावरण असतंच. पण यावेळी कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांच्याच उड्या अधिक दिसत आहेत. १९९९ सालापासून पुढे आलेल्या उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे मंत्रिपद असतानाही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यापाठोपाठ आता अनेकजण इकडून तिकडे जातील. आयत्यावेळी बाबा परूळेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले बाळ माने यांच्याकडूनही असाच काहीसा बॉम्बस्फोट अपेक्षित धरला जात आहे. दापोलीत राष्ट्रवादीची उमेदवारी संजय कदम यांना दिली जाणार असल्याने तेथील अन्य इच्छुकांकडून काहीतरी वेगळी भूमिका घेतली जाणार आहे. सिंधुदुर्गातही असेच काही बॉम्बस्फोट होणार आहेत. नजीकच्या काही दिवसात असे अनेक बदल आपल्या सर्वांसमोर येणार आहेत. त्यामुळे निवडणुकांचे चित्र बदलेल का? राजकारणी लोकांनी रंग बदलले म्हणून मतदार रंग बदलतील का, या प्रश्नांची उत्तरे आत्ताच देता येणार नाहीत. २00९ची विधानसभा निवडणूक, २0१२मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका यातील निकालांवर आता फार अवलंबून राहून चालणार नाही. कारण गेल्या काही काळात राजकारणात मोठे बदल झाले आहेत. हे बदल म्हणजे फक्त इकडून तिकडे जाणेच आहे. त्याखेरीज काहीच बदल नाहीत. जिल्ह्यात मोठे प्रकल्प आलेले नाहीत की, बेरोजगारी हटवण्याच्या कुठल्या नवीन योजना आलेल्या नाहीत. बदल झालेत ते नेते आणि कार्यकर्त्यांच्या गळ्यातल्या स्कार्फचे. नेत्यांच्या झेंड्यांचे. हा बदल लोकांना कितीसा रूचतोय, हेच आता कळणार आहे.
आघाडी, युतीचं बिनसल्याचा निर्णय जाहीर झाल्यापासून इतक्या लोकांनी आऊटगोर्इंग आणि इनकमिंग सुरू केलंय की आता कोण नेमक्या कोणत्या पक्षात आहे, हेच सामान्य माणसाला समजेनासं झालंय. गेल्या निवडणुकीत एका पक्षाचा प्रचार केलेले कार्यकर्ते आता घरोघरी जाताना दुसरा पक्ष घेऊन जातील. पुढच्या वेळी येताना हाच पक्ष असेल की, आणखी दुसरा असेल, असा प्रश्न सामान्य माणसाला पडणे स्वाभाविक आहे. नवरात्रीचा रोजचा रंग वेगळा असतो. पण, आता राजकीय पुढारी त्या नऊ रंगांपेक्षाही वेगळेच रंग दाखवत आहेत.
आता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चारही पक्ष एकमेकांसमोर उभे राहात असल्यामुळे नेमकेपणाने सगळ्यांचे चेहरे समोर येतील. आपण नेते आहोत, असे मिरवणाऱ्यांची खरी ताकद काय आहे, हे आता समोर येईल. केवळ ताकदच नाही तर खरे चेहरेही समोर येतील. कोण कशा उड्या मारतात, हेही आता समोर येईल. ध्येय आणि निष्ठा या गोष्टी आता कलियुगात ‘आऊट डेटेड’ झाल्या असल्याचे स्पष्ट होईल. हीच वेळ आहे, सर्वसामान्य माणसाने जागे होण्याची. सुरू असलेल्या राजकारणाकडे, त्यातील बदलांकडे डोळे उघडून पाहण्याची. राजकारणातील आजवरचा सर्वात गलिच्छ खेळ यावेळी सुरू आहे. लोकांना फसवण्याचे राजकीय पक्षांचे धंदे उघडे पडत आहेत. आता एकमेकांवर चिखलफेक करण्याच्या नादात एकमेकांची लपवलेली गुपितेही हे पक्ष बाहेर काढतील. म्हणून सावध होण्याची हीच योग्य वेळ आहे आणि राजकीय लोकांचे खरे चेहरे निरखून पाहण्याची वेळ आहे.
चौरंगी किंवा बहुरंगी लढतीमुळे सर्व ठिकाणच्या निवडणुका औत्सुक्याच्या ठरणार आहेत, हे नक्की आहे. नेमका कोणता पक्ष लोकांच्या मदतीसाठी धावतो, कोणता पक्ष सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करतो, हे आता लख्खपणे कळेल. एका अर्थाने सर्व पक्ष स्वबळ आजमावत आहेत, ही बाब लोकांच्या दृष्टीने चांगली आहे. एकमेकांना दोष देण्याची संधी आता कोणालाही मिळणार नाही. ज्याला त्याला आपापलेच पुढे जावे लागेल. आता मतदार सावध राहिले नाहीत तर पुढची अनेक वर्षे स्वत:लाच दूषणे द्यावी लागतील, हे नक्की आहे.
कोकण किनारा-- मनोज मुळ््ये