नामदेव शास्त्रींचे काय करायचे ते दसरा झाल्यावर पाहू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 04:55 IST2016-10-08T04:55:34+5:302016-10-08T04:55:34+5:30
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या यासंदर्भातील कथित संभाषणाच्या तीन क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

नामदेव शास्त्रींचे काय करायचे ते दसरा झाल्यावर पाहू !
प्रताप नलावडे,
बीड- भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा वाद विकोपाला गेलेला असतानाच आता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या यासंदर्भातील कथित संभाषणाच्या तीन क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. एका क्लिपमध्ये ‘नामदेव शास्त्रींचे काय करायचे ते आपण दसरा मेळावा झाल्यावर पाहू’, असे कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच, लोकांना मारून पुन्हा त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार आम्ही करतो...आम्ही काही साधे नाही, असे खळबळजनक वक्तव्य आहे. तथापि, या क्लिपच्या सत्यतेसंदर्भात पंकजा मुंडे समर्थकांनी साशंकता व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या या क्लिपस् आपण ऐकल्या असून गोपीनाथ मुंडे यांची कन्या माझ्याविषयी असे बोलू शकते, यावर अजूनही विश्वास बसत नाही आणि हे सर्व ऐकून माझे डोकेच सुन्न झाले आहे, अशी प्रतिक्रिया नामदेवशास्त्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ते म्हणाले, मी आजही पंकजा यांना गडाची कन्या मानतो आणि त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे आहे. परंतु धर्म आणि राजकारण याची गल्लत होऊ नये, यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे आणि ती पंकजा यांनी समजून घेतली पाहिजे. केवळ भाषण करण्यासाठी हट्टाला पेटणे उचित ठरणार नाही. त्यांना मेळावाच घ्यायचा असेल तर तो गडाच्या पायथ्याशी त्या घेऊ शकतात. दसरा सणानिमित्ताने गडावर कोणतेही राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका महंत नामदेवशास्त्री यांनी घेतल्याने गेल्या ११ महिन्यांपासून हा विषय चर्चेत राहिला आहे. (प्रतिनिधी)
भगवानगडावरील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास परवानगी द्यायची की नाही याबाबत जिल्हा प्रशासनाने पोलिसांकडे अभिप्राय मागविला आहे़ पोलिसांच्या अहवालावरून पुढील कार्यवाही केली जाणार आहे़या संदर्भात मुंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मुंबईतील रॉयलस्टोन या त्यांच्या निवासस्थानी दूरध्वनी केल्यानंतर त्यांचे सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांच्याशी संवाद झाला. परंतु त्या आता उपलब्ध नाहीत, असे सांगण्यात आले.
>मान-सन्मान काही असा मागून आणि भांडून मिळत नसतो. त्यामुळे पंकजा यांनी गडावर येणार आणि भाषण करणारच, असा घेतलेला पवित्रा चुकीचा आहे. त्या मंत्री आहेत. त्यांनी असे वागणे योग्य नाही. त्यांना किंवा कोणालाच आम्ही निमंत्रण दिलेले नाही. परंतु आता सत्तेच्या जोरावर त्या असे करणार असतील तर त्याची जबाबदारी शासनावर राहिल.
- नामदेवशास्त्री महाराज,
महंत, भगवानगड