शेतीकडे व्यवसाय म्हणून पहा - जैन
By Admin | Updated: August 23, 2015 00:34 IST2015-08-23T00:34:07+5:302015-08-23T00:34:07+5:30
कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरी शेतकरी वर्गाने खचून जाता कामा नये. उलटपक्षी उमेदीने कृषी क्षेत्रात नव्याने प्रयोग करावेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांनी नव्या

शेतीकडे व्यवसाय म्हणून पहा - जैन
मुंबई : कृषी क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत असल्या तरी शेतकरी वर्गाने खचून जाता कामा नये. उलटपक्षी उमेदीने कृषी क्षेत्रात नव्याने प्रयोग करावेत. विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांनी नव्या प्रयोगांकडे लक्ष द्यावे आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे, असे आवाहन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले.
परेल येथील आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अनिल जैन बोलत होते. ते म्हणाले की, गरिबीमुळे देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होते आहे. शिवाय अनियमित पावसामुळे कृषी क्षेत्रावर संकट आले आहे. परिणामी शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान होते आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी वर्गाने ठिबक सिंचन राबविले पाहिजे. कारण ठिबक सिंचनामुळे पाण्याची ६५ टक्के बचत होते. आणि त्याचा फायदा शेतकरी वर्गाला होतो.
विशेष म्हणजे ओनर प्रोफेशनल आॅन लाईन पद्धतीने शेती केली आणि राईट प्रॅक्टीस टेक्नोलॉजीचा वापर केला तर उत्तम फायदा होऊ शकतो. आम्ही असेच तंत्रज्ञान शेतकरी वर्गासमोर सादर करत असून, छोटे शेतकरी कसे फायद्यात येतील, यावर आमचा भर आहे. शिवाय ऊस, कापूस आणि केळी यासारखी उत्पादने वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. याबाबतची जनजागृती अधिक व्हावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांची मदत घेत आहोत. सहा शाळांतील आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शेती कशी करावी, त्याकडे कसे वळावे याबाबतचे मार्गदर्शन केले जाते आहे. कृषी क्षेत्रात नवे तंत्रज्ञान कसे वापरता येईल, याबाबतची माहिती दिली जात आहे.
केवळ शेतीसाठी शेती नाही तर एक व्यवसाय म्हणून उभारीला यावा, हा उद्देश आहे. शिवाय शेतकरी वर्गाला मदतीसाठी कंपनीने अडीच हजार एकर जागेवर कृषी क्षेत्रातील निरनिराळे प्रयोग सुरु केले आहेत. आणि त्या माध्यमातून कृृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम सुरु आहे. तसेच विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांसोबत कृषी क्षेत्राला वाव देण्यासाठी कार्य सुरु असल्याचेही जैन यांनी आर्वजून नमुद केले. (प्रतिनिधी)