मुंबई - महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात छुपा संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या जात आहे. त्यातच फडणवीसांकडे असलेल्या गृह विभागाने राज्यातील सर्व आमदार आणि प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेत रिपोर्ट सादर केला आहे. या आढावा रिपोर्टमध्ये ज्या आमदार, नेत्यांना गंभीर सुरक्षेचा धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये नाराजी आहे. कारण सुरक्षा कमी केलेल्या नेत्यांमध्ये शिंदेसेनेचे २० आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सरकारसोबत बंडखोरी केल्यानंतर शिंदेसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. त्यातील काही आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा होती. मात्र आता सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ज्या आमदार अथवा खासदारांना आधीपेक्षा सुरक्षेचा धोका कमी झाला आहे त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांचीही सुरक्षा कमी केली
गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे काही आमदार नाराज आहेत. त्याबाबत आमदारांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली आहे. परंतु गृह विभागाने फक्त शिंदेसेनेतील नेत्यांची सुरक्षा घटवली नाही तर राष्ट्रवादी आणि भाजपाच्या काही बड्या नेते आणि आमदारांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईत एकेकाळी अंडरवर्ल्ड सुरू होते तसेच मंत्रालयात अंडरवर्ल्ड सुरू आहे. समांतर सरकार सुरू असून यामुळे राजकीय अराजक निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश पाळू नका असं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस हे मोडून काढणार नसतील राज्य अराजकतेच्या खालीच जाईल. हे वेड्यांचे सरकार असून मंत्रालयात गोंधळ आहे. गृहनिर्माण खात्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.