बिल्डरांची सुरक्षा घेतली परत
By Admin | Updated: May 21, 2016 06:06 IST2016-05-21T06:06:53+5:302016-05-21T06:06:53+5:30
बिल्डरांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर आणि संभाव्य धोक्याची समीक्षा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी चाळीसपेक्षा अधिक बिल्डरांना पुरविलेली सुरक्षा काढून घेतली

बिल्डरांची सुरक्षा घेतली परत
डिप्पी वांकाणी,
मुंबई- बिल्डरांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर आणि संभाव्य धोक्याची समीक्षा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी चाळीसपेक्षा अधिक बिल्डरांना पुरविलेली सुरक्षा काढून घेतली आहे. 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार 'एचडीआयएल'चे वाधवा, लोढा समूहाच्या मंगलप्रभात लोढा यांची दोन मुले, तसेच लोखंडवाला, विनोद गोएंका आणि डी.बी. रिअल्टीचे शाहीद बलवा यांचा या यादीत समावेश आहे. या बिल्डरांना सरकारकडून नॉन कॅटेगरीतून पुरविलेल्या सुरक्षेसाठी दरमहा प्रति बिल्डर एक लाख रुपये खर्च येत आहे. अर्थात ज्या बिल्डरांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे, त्यात प्रामुख्याने मंगलप्रभात लोढा आणि नुस्ली वाडिया यांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या एका समितीने बिल्डरांच्या सुरक्षेचा हा आढावा मार्चमध्ये घेतला. सुरक्षा काढण्यात आलेल्यांमध्ये राकेश, धीरज, कपिल आणि सारंग वाधवा हे एचडीआयएल समूहाचे सदस्य आहेत. अभिषेक आणि अभिनंदन लोढा यांचीही सुरक्षा काढण्यात आली. ज्या चाळीस बिल्डरांची सुरक्षा काढून घेण्याचे ठरले, त्यात गौरव पोरवाल, युनिटी एन्फ्राचे अवरसेकर, गुलाम रस्सीवाला, पिरामल, कांचवाला समूह, सूरज मुचाला, युसूफ शेख, गणेश गुप्ता आणि सेठी समूहाच्या मालक आहेत. मुंबई पोलिसांकडून यापूर्वी तीन डझन कलाकारांना सुरक्षा होती. ही संख्या १५ वर आली आहे.
>पुनर्परीक्षण करून अहवाल
पोलिसांचे वेगवेगळे विभाग या धोक्याबाबत पुनर्परीक्षण करतात. त्यानंतर हा अहवाल समितीसमोर सादर केला जातो. त्यावर ही समिती सुरक्षा कायम ठेवायची अथवा नाही याबाबत निर्णय घेते.
लोकमतने जानेवारीत याबाबत वृत्त दिले होते की, शाहरुख खान आणि आमिर खान यांची सुरक्षा कशा प्रकारे घटविण्यात येत आहे. त्यांना पुरविलेले एस्कॉर्ट वाहन काढून घेण्यात येत आहे.