धर्मनिरपेक्षता ही भारताची गरज
By Admin | Updated: May 23, 2015 00:34 IST2015-05-22T22:19:24+5:302015-05-23T00:34:39+5:30
कुमार केतकर : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा प्रारंभ

धर्मनिरपेक्षता ही भारताची गरज
कणकवली : भारतात विविध धर्म आणि जातीतील लोक कित्येक वर्षे सहिष्णु सहजीवन जगत आले आहेत. भारताला कोणत्याही एका धर्मात किंवा जातीमध्ये बसवू शकत नाही. धर्मनिरपेक्षता ही भारत देशाची गरज असून किंबहुना ती आधीपासूनच नांदत आलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी येथील स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील प्रारंभीचे पुष्प गुंफताना केले. सिंधुरत्न फाऊंडेशनच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन केतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुभाष चव्हाण, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परूळेकर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत आदी उपस्थित होते.
‘बदलते जग आणि धर्मनिरपेक्ष भारत’ या विषयावर केतकर पुढे म्हणाले की, आपण धर्मनिरपेक्षबद्दलचे गैरसमज डोक्यातून काढून टाकले पाहिजेत. भारतातील धर्मनिरपेक्षतेमुळे असलेले स्थैर्य उधळण्याचा कट विविध देश करत आहेत. म्हणून धर्मनिरपेक्षतेची टिंगलटवाळी सुरू आहे. भारताचा मुख्य प्रश्न विकास हा नसून धर्मनिरपेक्षता कशी टिकवावी, हा आहे. शस्त्रास्त्रांची पुरवठादार अमेरिकेनेच अफगाणिस्तानमधील तालिबानी आणि पाकिस्तानातील आयएसआयला पोसले. भारतातील तणाव टिकून राहणे अमेरिकेला हवे आहे. हा तणाव टिकून ठेवण्यासाठी अतिरेक्यांची मदत घेतली जाते. या तणावाचे मूळ अविवेकी धर्मभावनेत आहे. दहशतवादासंदर्भात इस्लामिक अतिरेकी आणि हिंदू भारताची काय भूमिका आहे याबद्दलच विचार केला जातो. जग फक्त इस्लामिक दहशतवादाच्या छायेखाली नाही. खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी १९८०च्या सुमारास ५०-६० हजार लोकांना मारले आणि भारताला वेठीस धरले होते. श्रीलंकन दहशतवादी प्रभाकरन् हा हिंदू होता. अमेरिकेतील ओक्लाहोमा इमारतीचा विध्वंस करून अनेकांना ठार मारणारी व्हाईट सुप्रिमसी संघटना श्वेतवर्णीय ख्रिश्चनांची होती, असे कुमार केतकर म्हणाले. नारायण राणे म्हणाले की, प्रगत देशांनी आपल्या विकासाचा मार्ग कसा काढला व आपण कसा काढावा यासाठी चर्चा व्हायला हवी. प्रगत देशांचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)