गुपचूप-गुपचूप-

By Admin | Updated: September 26, 2014 23:30 IST2014-09-26T23:00:48+5:302014-09-26T23:30:58+5:30

सरकारनामा

Secretly-secretly- | गुपचूप-गुपचूप-

गुपचूप-गुपचूप-


विट्याच्या सदाभाऊंनी टोपी सरळ केली. टोपीची ‘कोंच’ नीट तपासली आणि संजयकाकांना फोन लावला. ‘बोला भाऊ’, असं काकांनी विचारताच भाऊंनी लगेच प्रश्नाला हात घातला, ‘आता कसं हो?...’ त्यांचा प्रश्न मध्येच तोडत काका उत्तरले, ‘भाऊ, कशाला काळजी करताय? पाचजण नाचायला लागले की, तुमचीच फत्ते!’ पण एक शंका भाऊंचं मन कुरतडत होतीच... ‘व्हय, पण तुमचं काय? तुम्ही गोपीला हात देणार की...’ त्यांचा प्रश्न संपण्याआधीच ‘हॅलो... हॅलो... ऐकायला येत नाही. रेंजमध्ये नाही. नंतर बोलू...’ असं म्हणत काकांचा फोन बंद कट झाला... तेव्हापासून काकांचा मोबाईल ‘डायव्हर्ट’ झालाय. सदाभाऊंनी लावला की, त्यावर ‘जय मल्हाऽऽर’ची टोन ऐकायला येतेय आणि ‘कॉल’ गोपीचंदच्या माणसाकडं जातोय म्हणे!
विट्याच्या अनिलभाऊंचंही तसंच. त्यांनी रात्रीच आबांना कॉल केला. आबा रात्रीच फोनवर भेटतात म्हणे. (ते दिवसभर कुठं असतात, तपासा... असा प्रचार हल्ली काकांनी सुरू केलाय.) ‘आबा, तुमचं ऐकून भगवा खांद्यावर घेतलाय, पण आता कसं करायचं? तुम्ही आटपाडीकरांबरोबर राहणार, असं सगळे म्हणताहेत...’ भाऊंना आबांच्या उत्तराची अपेक्षा होती. ते काही क्षण थांबले; पण संभाषण एकतर्फीच सुरू होतं. कॉल लागताच तो कट करून आबांनी मोबाईल पीएकडं दिला होता! नंतर तर ते ‘रेंज’बाहेर गेले.
...आणि खरंच आबा ‘रेंज’बाहेर गेले. त्यांनी दंडोबाचा डोंगर गाठला. जयसिंगतात्या आधीच येऊन झाडाच्या आडोशाला थांबलेले दिसले. आबा स्वत:च जवळ गेले आणि कानात कुजबूजले, ‘तिकीट घ्या. त्येचा सूड घ्यायची संधी सोडू नका. शेंडगेबापूंना संपवल्याचा बदला घ्या.’ आबांनी हाक्केबापूंना खुणावलं. बापूंनी तात्यांच्या खांद्यावर हात टाकला. गाडीकडं नेलं. (तिथं काय झालं, हे चाणाक्ष लोकांना सांगायला हवं का?) काही वेळातच जयसिंगतात्यांनी आरेवाडी गाठली. बिरोबाकडं गाऱ्हाणं मांडलं. तेवढ्यात संजयकाकांचा फोन आला... कुणी बघतंय का, असं इकडंतिकडं बघत तात्यांनी तो झट्दिशी बंद केला. तो अजून ‘स्वीच आॅफ’ आहे!
जाता जाता : साहेब साखराळेत कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर झोपाळ्यावर बसलेले. सुरेशअण्णा सकाळीच तिथं पोहोचले होते. ‘अर्ज भरा, संध्याकाळी ठरवू’, असं साहेबांनी सांगूनही ते हेका सोडत नव्हते. साहेबांचा फोन वाजला. ‘बोला पाहुणे’, असं म्हणत साहेब थांबले... तिकडचं बोलणं होताच त्यांनी विचारलं, ‘ शिराळ्याकडं कसं बघू आता?... पण खर्चाचं काय? तुमची तयारी आहे काय? झेपत नसंल तर कशाला उतरताय?’ पुढं साहेबांनी फोनवरून आकडेमोड सांगितली. ती ऐकूनच सुरेशअण्णा कावरेबावरे झाले... ‘साहेब, मग तुम्ही म्हणताय तसंच करू’, असं सांगत लगेच उठले... साहेबांचा पायानं झोका सुरू झाला. पीए जवळ आला. अण्णा गेल्याचं बघून साहेब म्हणाले, ‘बरं झालं. तू वेळेवर कॉल केलास. नाहीतर अण्णांनी पाठ सोडली नसती!’
- श्रीनिवास नागे

Web Title: Secretly-secretly-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.