मुंबई-गोवा महामार्गाचा दुसरा टप्पा टोल फ्री
By Admin | Updated: July 1, 2015 02:04 IST2015-07-01T02:04:02+5:302015-07-01T02:04:02+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-झाराप या टप्पा क्रमांक-२साठी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून, या प्रकल्पासाठी लागणारा निधी केंद्र सरकार उभारणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचा दुसरा टप्पा टोल फ्री
आविष्कार देसाई , अलिबाग
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-झाराप या टप्पा क्रमांक-२साठी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून, या प्रकल्पासाठी लागणारा निधी केंद्र सरकार उभारणार आहे. त्यामुळे या मार्गासाठी टोल द्यावा लागणार नसून, आॅक्टोबरमध्ये कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी येथे दिली. अलिबाग येथील दक्षता व संनियंत्रण समितीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
इंदापूर-झाराप या ३६६ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम केंद्र सरकार करणार असून, आॅक्टोबर महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी २ हजार ९०० कोटी रुपये खर्च येणार होता. त्यानंतर तो सुमारे ३ हजार ९०० कोटींवर पोहोचला. मात्र या मार्गावर सर्वांच्या सोयीसाठी एलिव्हेटेड रोड, काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याची प्रकल्प किंमत सुमारे ५ हजार कोटींपर्यंत जाऊ शकते असे, गीते यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाचा पहिला टप्पा पळस्पे- इंदापूर असा ८४ किलोमीटरचा आहे. सध्या ३० टक्के काम पूर्ण झाले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काम रखडण्याला जमीन संपादन, अतिक्रमणे अशी विविध कारणे आहेत.
या प्रकल्पासाठी सुमारे अकराशे कोटी रुपयांचा खर्च आहे. सध्या १४५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. विविध बँकांनी ७५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करावे, त्याचप्रमाणे उर्वरित ७० कोटी रुपये ठेकेदाराने उभे करायचे आहेत. ७० कोटी रुपये ठेकेदाराला उभे करता येत नसतील, तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्या मंत्रालयामार्फत तो निधी उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. गडकरी यांनी मागील बैठकीत हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले.