गोवा पोलीस ‘पुढारी’ला बजावणार दुसरी नोटीस
By Admin | Updated: October 20, 2015 01:27 IST2015-10-20T01:27:32+5:302015-10-20T01:27:32+5:30
मटक्याचे आकडे छापल्याबद्दल सविस्तर माहिती देण्यासह चौकशीला उपस्थित राहण्याबाबत ‘पुढारी’ या वृत्तपत्राला दुसरी नोटीस पाठविणार असल्याची माहिती क्राइम

गोवा पोलीस ‘पुढारी’ला बजावणार दुसरी नोटीस
पणजी : मटक्याचे आकडे छापल्याबद्दल सविस्तर माहिती देण्यासह चौकशीला उपस्थित राहण्याबाबत ‘पुढारी’ या वृत्तपत्राला दुसरी नोटीस पाठविणार असल्याची माहिती क्राइम ब्रँचकडून देण्यात आली. पहिल्या नोटिशीला तांत्रिक कारण पुढे करून ‘पुढारी’ने जबाबदारी झटकली होती.
मटक्याचे आकडे प्रसिद्ध केल्याबद्दल ‘पुढारी’ व ‘तरुण भारत’ वृत्तपत्राविरुद्धच्या तपासाने वेग घेतला आहे. दोन्ही वृत्तपत्रांना क्राइम ब्रँचने नोटिसा पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. तसेच या विषयाची सविस्तर माहिती देण्याची सूचना केली होती. ‘तरुण भारत’कडून त्याला प्रतिसाद देण्यात आला; परंतु ‘पुढारी’कडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल केलेली जनहित याचिका निकाली काढताना मटका जुगारासाठी जबाबदार असलेली वृत्तपत्रे, पोलीस, राजकारणी आणि इतरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्याची अंमलबजावणी करताना क्राइम ब्रँचने भारतीय दंड संहिता आणि गोवा-दमण-दिव जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला होता. (प्रतिनिधी)
‘पुढारी’चे तांत्रिक कारण
पुढारीतील ‘प्रमुख संपादकां’ना क्राइम ब्रँचने पत्र पाठविले होते. गोव्यात ‘पुढारी’चे प्रमुख संपादक नसल्यामुळे हे पत्र लागू होत नसल्याचा दावा वृत्तपत्राकडून करण्यात आला. ‘पुढारी’ने हे तांत्रिक कारण पुढे केल्यामुळे आता क्राइम ब्रँचकडून निवासी संपादकांच्या नावाने नवीन पत्र पाठविण्यात येणार आहे.