कारंजात दुस-या दिवशीही संचारबंदी कायम
By Admin | Updated: July 15, 2015 23:15 IST2015-07-15T23:15:15+5:302015-07-15T23:15:15+5:30
छेडखानीतून दोन गटात झाली होती मारहाण, १८ आरोपींना अटक.

कारंजात दुस-या दिवशीही संचारबंदी कायम
कारंजा (वाशिम) : अल्पवयीन मुलीच्या छेडखानीवरून दोन गटात मोठय़ा प्रमाणात मारहाण झाल्यानंतर कारंजा येथे बुधवारीही संचारबंदी कायम होती. दरम्यान, जमावाच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या एका युवकाचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये नेऊन, आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री आंदोलन केले. एका अल्पवयीन मुलीच्या छेडखानीनंतर मंगळवारी कारंजा परीसरातील अस्ताना पुरा, डाफणीपुरा, माळीपुरा, शिवाजीनगर, भारती पुरा आदी भागांमध्ये दोन गट समोरासमोर येऊन दगडफेक आणि काही दुकानांची तोडफोड झाली होती. जमावावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यासाठी तैनात केलेल्या पोलिसांच्या वाहनांवरही जमावाने दगडफेक केली होती. याप्रकरणी १३ जणांना पोलिसांनी १४ जुलै रोजी रात्री अटक केली. अल्पवयीन मुलीच्या छेडखानीनंतर संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत मंगळवारी बाबू उर्फ सजाउद्दिन इस्लामोद्दिन याचा मृत्यू, तर अस्लम नामक युवक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला. अधिकार्यांनी समजूत घातल्यानंतर बुधवारी सकाळी मृतावर अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान, छेडखानी प्रकरणात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शहरातील वातावरण तणावपूर्ण असल्याने बुधवारी संचारबंदी आणखी कडक करण्यात आली. त्यामुळे शहरातील शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठ दिवसभर बंद होती. शहरात ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, राज्य राखीव दलाचे अमरावती आणि यवतमाळ येथील जवानही बंदोबस्तासाठी कारंजात दाखल झाले आहेत.