मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारी दुसरी ‘बेस्ट’ भाडेवाढ १ एप्रिलपासून
By Admin | Updated: March 30, 2015 04:20 IST2015-03-30T04:20:56+5:302015-03-30T04:20:56+5:30
अर्थसंकल्पातून १०० कोटींचा निधी बेस्टला जाहीर केल्यानंतरही बेस्ट भाडेवाढ अटळ आहे. त्यामुळे दोन महिन्यांनंतर पुन्हा म्हणजेच १ एप्रिलपासून मुंबईकरांवर

मुंबईकरांच्या खिशाला चाट देणारी दुसरी ‘बेस्ट’ भाडेवाढ १ एप्रिलपासून
मुंबई : अर्थसंकल्पातून १०० कोटींचा निधी बेस्टला जाहीर केल्यानंतरही बेस्ट भाडेवाढ अटळ आहे. त्यामुळे दोन महिन्यांनंतर पुन्हा म्हणजेच १ एप्रिलपासून मुंबईकरांवर तिकीट दरवाढीची टांगती तलवार आहे़ एक ते १० रुपये अशी ही दरवाढ असून, बेस्ट उपक्रमाचे किमान बसभाडे आठ रुपये होणार आहे़
दोन महिन्यांपूर्वी म्हणजे १ फेब्रुवारीपासून बेस्टचे किमान भाडे सात रुपये करण्यात आले होते़ तर वातानुकूलित बसगाड्यांचा किमान प्रवास २५ रुपये झाला आहे़ आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी दोन भाडेवाढ करण्याची परवानगी यापूर्वीच बेस्ट उपक्रमाने पालिकेकडून घेतली आहे़ पालिकेने सन २०१५-२०१६ चा अर्थसंकल्प मंजूर करताना त्यात वाढीव तरतुदींतून बेस्टला १०० कोटींचे आश्वासन दिले़
बेस्टवर २,४०० कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे, तर वाहतूक विभागात ७७० कोटींची तूट आहे़ दरवाढीतून बेस्टला वार्षिक दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचे उत्पन्न अधिक मिळेल़ मुंबई महानगर प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणानेही या दरवाढीला मंजुरी दिली आहे़ पालिकेकडून जाहीर झालेले १०० कोटी हे नवीन बस खरेदीसाठी मिळणार आहेत़ त्यामुळे भाडेवाढ अटळ असल्याचे बेस्टमधील अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)