सावंतवाडी/ गोंदिया : कोकण आणि विदर्भला गुरुवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सावंतवाडी परिसर सकाळी भूकंपाने हादरला. तेथील तीव्रता तीन रिश्टर स्केल होती. तर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना रात्री भूकंपाचे सौम्य झटके बसले. मात्र याची तीव्रता लगेच कळू शकली नाही. सुदैवाने कोठेही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.सावंतवाडी परिसरात सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू तिलारी धरणापासून ४० किलोमीटर अंतरावर सावंतवाडीच्या दिशेने असून, ३ ते ४ सेकंद जाणावलेल्या या भूकंपाने बांदा येथे दोन घरांना, तर सावंतवाडी शहरातील दोन इमारतींना भेगा गेल्या आहेत. भूकंपाची दखल शासनाच्या मिरी तसेच पुणे वेधशाळेने घेतली असून कोयनानगर भूमापन केंद्राकडून अहवाल मागविला आहे. भूकंपाचा धक्का जाणवताच सावंतवाडीतील काही शाळा सोडून दिल्या, तर काही शाळांतील मुलांना मैदानावर आणण्यात आले. भूकंपाचे हादरे जाणवताच इमारतीमधील सर्व नागरिक रस्त्यावर आले होते. हा भूकंप तिलारी भूमापन केंद्राच्या अहवालानुसार २.९० रिश्टर स्केलचा असल्याचे सांगण्यात आले. कोयनानगर भूमापन केंद्राने जिल्हा प्रशासनास दिलेल्या अहवालात तो ३ रिश्टर स्केलचा असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
कोकण आणि विदर्भाला भूकंपाचे सौम्य धक्के
By admin | Updated: July 24, 2015 01:22 IST