माळीणच्या ढिगा-यात जिवांचा शोध सुरूच
By Admin | Updated: August 1, 2014 09:07 IST2014-08-01T05:08:55+5:302014-08-01T09:07:49+5:30
देव तारी त्याला कोण मारी!’ या म्हणीचा सुखद प्रत्यय माळीण दुर्घटनेत आला

माळीणच्या ढिगा-यात जिवांचा शोध सुरूच
माळीण (ता. आंबेगाव) : ‘देव तारी त्याला कोण मारी!’ या म्हणीचा सुखद प्रत्यय माळीण दुर्घटनेत आला. अख्ख्या गावावर डोंगर कोसळल्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मायलेकाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी रात्रीपर्यंत ढिगाऱ्याखाली ४४ मृतदेह सापडले. अद्यापही २०० ग्रामस्थ चिखलाच्या राडारोड्याखाली अडकले असण्याची भीती असून, या जिवांचा ढिगाऱ्याखाली शोध घेणे सुरूच आहे.
माळीणवर बुधवारी सकाळी डोंगराची महाकाय दरड कोसळल्यानंतर दोन तासांच्या आतच मदतकार्य सुरू झाले. मात्र, प्रचंड पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या. रात्रभर सर्चलाईटच्या प्रकाशात चिखलाचे ढिगारे उपसण्यात येत होते. सायंकाळच्या सुमारास एक महिला जीवंत सापडल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनाही (एनडीआरएफ) हुरूप आला होता. मात्र, रात्रभरात केवळ तीनच मृतदेह सापडू शकले. आज सकाळपासून काम आणखी वेगाने सुरू झाले.
चार पोकलेन मशीनच्या साहाय्याने ढिगारा उपसण्यास सुरुवात झाली. मात्र, गावाचा परिसर चिंचोळा असल्याने आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असल्याने एकाच बाजूने उत्खनन सुरू होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत गावातील मारुती मंदिराच्या परिसरापर्यंतचाच ढीग हटविणे शक्य झाले होते. मुख्य गावाचा परिसर मंदिरानंतरच सुरू होत असल्याने बहुतांश घरांवरील चिखलाचा ढीग हटविणे अशक्य झाले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण चिखल हटविण्यास किमान पाच ते सहा दिवस लागू शकतात. त्यानंतरच मृतांचा निश्चित आकडा कळू शकणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे भेट देऊन दुर्घटनेत बचावलेल्या ग्रामस्थांना धीर दिला. दुसरीकडे डोंगररांगात पडकई कार्यक्रम राबविल्याने ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश तळेकर यांनी याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.