‘त्या’ बाळाच्या आईचा शोध सुरू
By Admin | Updated: April 29, 2016 06:11 IST2016-04-29T06:11:54+5:302016-04-29T06:11:54+5:30
नांदेडहून १ लाख ८० हजार रुपयांना विकत घेतलेले मूल कुमारी मातेचे असून, ताडदेव पोलीस सध्या या मुलाच्या आईचा शोध घेत आहेत.

‘त्या’ बाळाच्या आईचा शोध सुरू
मुंबई : नांदेडहून १ लाख ८० हजार रुपयांना विकत घेतलेले मूल कुमारी मातेचे असून, ताडदेव पोलीस सध्या या मुलाच्या आईचा शोध घेत आहेत. मुलाच्या आईच्या चौकशीत यामागील सत्य समोर येणार असल्याचे ताडदेव पोलिसांचे म्हणणे आहे.
दक्षिण मुंबईतील एका दाम्पत्याने नांदेडहून १.८० लाख रुपयांना मूल विकत आणल्याचा खुलासा पोलीस आयुक्तांना आलेल्या निनावी पत्रातून झाला होता. पोलिसांच्या चौकशीत हे मूल एका कुमारीमातेचे असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आॅगस्ट २०१४मध्ये एका कुमारीमातेने हे मूल बालगृहात आणून दिले होते. त्याची रीतसर नोंदणीही करण्यात आल्याचे गुट्टे हिने चौकशीत पोलिसांना सांगितले आहे. बालगृहातील नोंदी पाहून या मुलाच्या मातेविषयी अधिक सांगता येईल, असेही या संचालिकेने चौकशीत सांगितले.
दरम्यान, आपण दाम्पत्याला मूल दिल्यानंतर दत्तकप्रक्रिया नंतर करू या, असे सांगितले होते, परंतु ते परत आलेच नाहीत, असा दावाही आता संचालिका पोलिसांपुढे करत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार विकत आणलेल्या मुलाला संगोपनासाठी किंग्ज सर्कल येथील मानव सेवा संघ या स्वयंसेवी संस्थेत ठेवले आहे. बाळाच्या आईचा शोध लागल्यास यामागील सत्य समोर येईल. तिने स्वखुशीने या बाळाला संस्थेकडे सोपविले होते का, की यामागे आणखी काही गूढ आहे याचा उलगडा यातून होणार असल्याची माहिती ताडदेव पोलिसांनी दिली.
>दक्षिण मुंबईतील एका दाम्पत्याने नांदेडहून १.८० लाख रुपयांना मूल विकत आणल्याचा खुलासा पोलीस आयुक्तांना आलेल्या निनावी पत्रातून झाला.
ताडदेव पोलिसांनी या प्रकरणात मूल विकत घेणारे दाम्पत्य, त्यांना मदत करणारे दोन नातेवाईक आणि मूल विकणारी नांदेडच्या सुनीता बालगृहाची संचालिका सत्यश्री गुट्टे यांना अटक केली आहे.