घरोघरी जाऊन डेंग्यू अळीचा शोध घ्या

By Admin | Updated: October 28, 2014 00:26 IST2014-10-28T00:26:32+5:302014-10-28T00:26:32+5:30

शहरात वाढलेल्या डेंग्यूच्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी घरोघरी भेटी देऊन डेंग्यू अळीचा शोध घेण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले.

Search for dengue larvae from door to door | घरोघरी जाऊन डेंग्यू अळीचा शोध घ्या

घरोघरी जाऊन डेंग्यू अळीचा शोध घ्या

महापालिका : आयुक्त श्याम वर्धने यांचे निर्देश
नागपूर : शहरात वाढलेल्या डेंग्यूच्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी घरोघरी भेटी देऊन डेंग्यू अळीचा शोध घेण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले.
मनपाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी, शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन डेंग्यू अळीची उत्पत्तीस्थाने शोधत आहेत. परंतु या आजाराची व्याप्ती विचारात घेता नियंत्रणासाठी व्यापक यंत्रणा राबविण्याची गरज आहे. डेंग्यू डासाच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करावी. कर्मचाऱ्यांनी घरांची तपासणी केल्यानंतर झोन अधिकाऱ्यांनी फेरतपासणी करावी. यात घराची व्यवस्थित तपासणी झाली नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश वर्धने यांनी दिले.
आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीला अप्पर आयुक्त हेमंतकुमार पवार, उपायुक्त संजय काकडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, हत्तीरोग व हिवताप रोग नियंत्रण अधिकारी डॉ. जयश्री थोटे, सुधीर फटिंग आदी उपस्थित होते.
वर्धने यांनी डेंग्यूबाबत झोननिहाय आढावा घेतला. या आजाराबाबत अद्याप जागृती निर्माण झालेली नाही. या डासाची अळी कशी असते. ती कशी निर्माण होते. त्यावर प्रतिबंध कसा घालता येईल. या दृष्टीने नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. डेंग्यूसंदर्भात जागृती निर्माण होण्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर करावा, अशी सूचना वर्धने यांनी केली.
प्रत्येक झोनला दररोज १००० घरांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान १०० घरांची तपासणी करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या तपासणीनंतर झोन अधिकाऱ्यांनी घरांची आकस्मिक तपासणी करावी. नेमून दिल्यानुसार तपासणी न करणाऱ्या फायलेरिया निरीक्षकांना नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Search for dengue larvae from door to door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.