दिघ्यात दोन इमारतींना सील
By Admin | Updated: March 1, 2017 05:40 IST2017-03-01T05:40:43+5:302017-03-01T05:40:43+5:30
दिघ्यातील चारपैकी दुर्गामाता आणि अवधूत छाया या दोन इमारती रिकाम्या करून, त्या सिडकोच्या ताब्यात दिल्या.

दिघ्यात दोन इमारतींना सील
नवी मुंबई : मंगळवारी कोर्ट रिसिव्हरने कडेकोट पोलीस बंदोबस्तात दिघ्यातील चारपैकी दुर्गामाता आणि अवधूत छाया या दोन इमारती रिकाम्या करून, त्या सिडकोच्या ताब्यात दिल्या. सिडकोने या इमारतींना सील ठोकले असून उर्वरित दोन इमारतींवर पुढील दोन दिवसांत कारवाई होण्याचे संकेत सिडकोच्या संबंधित विभागाने दिले आहेत. दरम्यान, या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला; परंतु उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने कोर्ट रिसिव्हरने दोन इमारती रिकाम्या करून त्यांचा ताबा सिडकोला दिला.
दिघा परिसरातील ९९ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यातील बहुतांशी इमारती एमआयडीसी व सिडकोच्या जागेवर आहेत. गेल्या दीड वर्षापासून या इमारतींवर कारवाई सुरू आहे. आतापर्यंत केरू प्लाझा, शिवराम आणि पार्वती या तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तर गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अंबिका व कमलाकर या दोन इमारतींना सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. सोमवारी उच्च न्यायालयाने अमृतधाम, अवधूत छाया, दुर्गामाता प्लाझा आणि दत्तकृपा या चार इमारतींची याचिका फेटाळली. तसेच या इमारती तातडीने रिकाम्या करून पुढील कारवाईसाठी त्या सिडकोच्या सुपुर्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी कोर्ट रिसिव्हरने कडेकोट पोलीस बंदोबस्तात या चार इमारती रिकाम्या करण्याची कारवाई सुरू केली. त्याला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला. सध्या शाळा आणि महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू आहेत. बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे थोडा वेळ द्यावा, अशी विनंती रहिवाशांनी केली; परंतु न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत कोर्ट रिसिव्हरने चारपैकी अवधूत छाया आणि दुर्गामाता प्लाझा या दोन इमारती रिकाम्या करून त्या सिडकोच्या ताब्यात दिल्या. (प्रतिनिधी)
।महिला पत्रकारासह कॅमेरामनला मारहाण
दिघा येथील अमृतधाम इमारतीवर जप्तीची कारवाई सुरू होती. या वेळी लगतच्या सिद्धिविनायक इमारतीच्या छतावरून वृत्तवाहिनीचे कॅमेरामन संदीप भारती हे चित्रीकरण करत होते. या वेळी महिला पत्रकार स्वाती नाईक याही त्या ठिकाणी होत्या. त्यांना पाहताच कारवाई सुरू असलेल्या इमारतीमधील रहिवाशांच्या जमावाने त्यांच्या दिशेने दगडफेक करत भ्याड हल्ला केला. त्यांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी नाईक व भारती यांनी त्याच इमारतीमधील एका घराचा आसरा घेतला; परंतु ते लपलेल्या घराची माहिती मिळताच जमावाने त्या घराच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांना आसरा देणाऱ्या त्या कुटुंबीयाने भीतीपोटी दरवाजा उघडला असता, जमावाने घरात घुसून सामानाची तोडफोड केली. तसेच संदीप भारती व स्वाती नाईक यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. अखेर काही सुज्ञ नागरिकांनी केलेल्या मध्यस्थीनंतर दोन्ही पत्रकारांची जमावाच्या तावडीतून सुटका झाली. मात्र, या घटनेत दोघेही जखमी झाले असून भारती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रबाळे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
।रहिवाशांनी घेतला मंदिरात आश्रय
मंगळवारपासून इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. यातच दिघ्यातील दुर्गामाता प्लाझा आणि अवधूत छाया या दोन इमारतींतील रहिवाशांना बेघर व्हावे लागले.
त्यामुळे या इमारतींतील अनेक रहिवाशांनी शेजारच्या दुर्गामाता मंदिराचा आश्रय घेतला. ऐन परीक्षेच्या काळात बेघर होण्याची पाळी आल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.