माणसं गिळतोय समुद्र

By Admin | Updated: October 1, 2015 00:28 IST2015-09-30T22:58:26+5:302015-10-01T00:28:55+5:30

गुहागर तालुका : मज्जा करायला आले, जीव देऊन गेले

The sea swallows the ocean | माणसं गिळतोय समुद्र

माणसं गिळतोय समुद्र

संकेत गोयथळे- गुहागर तालुक्याला ३५ किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. पुणे, मुंबई व इतर भागातून आलेल्या पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा मोह टाळता येत नाही. सुट्टीत मज्जा करण्याच्या मुडमध्ये समुद्रात डुंबत असतात. यातून सन २००४पासून तब्बल २५हून अधिक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. समुद्रामध्ये बुडताना एखाद्याला वाचवणे हे कठीण काम असले तरी वेळीच सुरक्षा समन्वयक किंवा तातडीने कोणी वाचवण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात अनेक जीव वाचू शकतात. यासाठी स्थानिक प्रशासन असलेल्या नगरपंचायतीसह पोलीस व ग्रामस्थांचीही तेवढीच जबाबदारी आहे.
सलग लांबीच्या बाबतीत केरळमधील मद्रासच्या मरीना बीचला १२ किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे. यानंतर गोवा व गुहागर, असगोली गावाला ७ कि. मी. ची सलग किनारपट्टी आहे. येथील धार्मिक कौटंुबिक पर्यटनाबरोबरच गोव्याच्या धर्तीवर समुद्रात पोहण्याची मजा घेण्यासाठी अनेक युवा पर्यटक येतात. पुणे, मुंबईसाठी गोव्याला पर्याय म्हणून गुहागरला पर्यटक पसंती देत आहेत. राई भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवेनंतर आता गुहागरात पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे.
सन २००४मध्ये पहिल्यांदाच पुणे येथील तारदाळकर कुटुंबातील एकाचवेळी पाचजण बुडाले होते. गुहागरच्या समुद्रात पर्यटक बुडण्याची ही पहिलीच वेळ होती व त्यामध्ये पूर्ण कुटुंबच गेल्याने या मोठ्या घटनेचा सर्वांनीच धसका घेतला.
अलीकडचा विचार करता मागील दोन घटनेत पंधरा जणांना जीव गमवावा लागला आहे. यामधील बहुतांशी मृत्यू हे नव्याने झालेल्या जेटी शेजारील पाण्यात डुंबताना झाले आहेत. २० मार्च २०१४रोजी पाचजण बुडाले होते. सन २०१५मध्ये शेख व चांदा कुटुंबीयांमधील सातजण असे एकूण १० जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या दहा वर्षात जेवढे मृत्यू झाले नाहीत एवढे बुडून गेल्या दोन वर्षात झाले आहे.
याचे प्रमुख कारण नव्याने झालेली जेटी आहे असे ग्रामस्थ मानतात ही बाब खरी असली तरीही समुद्रकिनारी कुठल्याही प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था ठेवलेली नाही. नगरपंचायतीतर्फे येथे कोणीही सुरक्षा समन्वयक नाही. महसूल विभागातर्फे असणारा आपत्कालीन विभाग फक्त कागदावरच असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.
पर्यटक गुहागरला भेट देतात. पर्यटन वाढवायचे असेल तर या पर्यटकांना पाण्यामध्येच उतरु नका असे सांगणे चुकीचे आहे. यासाठी गोवा व गणपतीपुळे येथील उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन नियोजन केले पाहिजे. गोव्याच्या किनाऱ्यावर लाखो पर्यटक येतात. मात्र, त्याप्रमाणात होणारे अपघात नाममात्र आहेत. कारण येथे वेगळी सुरक्षा यंत्रणा आहे. पाण्याची खोली व पर्यटकांचा अतिउत्साह लक्षात घेऊन वेळोवेळी सक्त सुचना देऊन बाहेर काढले जाते. गणपतीपुळेमध्येही यापूर्वी भाविक व पर्यटकांचे बुडण्याचे प्रमाण मोठे होते. आता येथेही सुरक्षा समन्वयक ठेवल्याने सहसा अपघात होत नाहीत. अनेकजणांना बुडताना बाहेर काढण्यात आले आहे, याचा धडा प्रशासनाने घेतला पाहिजे.
तसेच बुडण्याचा धोका टळावा यासाठी जेटीचा पुढील भाग हा बंदीस्त करुन जेटीच्या दोन्ही बाजूंनी रेलींग करणे आवश्यक आहे. ही प्लोटींग जेटी असल्याने समुद्राच्या मुखात काही मीटर आतमध्ये आहे. येथे पाणी खोली वाढते तसेच लाटांचा मारा पूर्ण होत नसल्याने येथील पाणी दिशा बदलत असते.


बुडणाऱ्यांची यादी मोठी
सन २००५मध्ये अजित चंद्रकांत निमकर (२५, चिपळूण), मनोहर लक्ष्मण शिंदे (३५, तुंबाड, ता. खेड) यांना प्राण गमवावे लागले. यानंतर प्रशांत कणभरे (३०), गौरव कुडाळे (१९), अविनाश जाधव (२४), अमोल माळवे (२१), रुपेश पवार (२२) हे मित्र एकमेकांना वाचविण्यामध्ये समुद्रात ओढले गेले. २०१० मध्ये नागपूर येथील शेखर महाजन, २०१४ मध्ये प्रितेश पांडुरंग बोबले (२२, तांबी, चिपळूण) याचा बळी गेला. यानंतर महाविद्यालयीन सहलीमधील तरुण बुडाले होते. मुंबई आयटीमधील तरुण तसेच चिपळूण शहरातील एका दुकानदाराचा मुलगाही बुडाला होता.
गुहागर अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस्तर्फे दोन वर्षे स्पीड बोट गेम सुविधा सुरु करण्यात आली. व्यवस्थापक मयुरेश साखरकर व स्पीड बोट चालक प्रदेश तांडेल यांच्या सहाय्याने काही पर्यटकांना बुडताना वाचवण्यात आले. ही बाब लक्षात घेता तातडीची मदत मिळाल्यास अनेक जीव वाचू शकतात. यासाठी नियोजन व्हायला हवे. वर्षभरातील दहाजणांचा मृत्यू होताना ही स्पीड बोट बंद होती, हेही गंभीर आहे.

Web Title: The sea swallows the ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.