कृषी विभागाच्या पदभरतीत ग्रामीण युवकांसाठी जागा राखीव ठेवण्याची चाचपणी
By Admin | Updated: August 29, 2016 01:39 IST2016-08-29T01:39:03+5:302016-08-29T01:39:03+5:30
कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची माहिती

कृषी विभागाच्या पदभरतीत ग्रामीण युवकांसाठी जागा राखीव ठेवण्याची चाचपणी
अकोला दि. २८ : राज्य शासनाच्या कृषी विभागात आगामी काळात मोठय़ा संख्येने रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी लवकरच पदभरती घेण्यात येणार असून, या पदभरतीमध्ये ग्रामीण भागातील युवकांसाठी काही जागा राखीव ठेवता येतात का, याची चाचपणी कृषी विभागाच्या सचिवांसोबत चर्चा करून घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी रविवारी येथे केले. जिल्हा पत्रकार संघाद्वारे आयोजित पाल्यांच्या सत्कार कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. कृषी विभागात मोठय़ा प्रमाणात रिक्त पदे आहेत. रिक्त पदांमुळे कृषी विभागाची अनेक कामे रखडली आहेत. या विभागाचे काम सुरळीत व्हावी, या उद्देशाने लवकरच रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही पदभरती करताना काही जागा ग्रामीण भागातील कृषी पदवीधरांसाठी राखीव ठेवता येतील का, याबाबत आपण कृषी विभागाच्या सचिवासोबत चर्चा केल्याचे भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार गोवर्धन शर्मा,भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, गिरीष जोशी, नगरसेवक गोपी ठाकरे, माजी नगरसेवक पवन पाडिया आदींची उपस्थिती होती. कृषी पत्रकारिता करणार्यांचा गौरव करणार कृषी क्षेत्रातील विविध घडामोडी, तसेच नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचविणार्या कृषी पत्रकारांना त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांचा शासकीय गौरव करण्याचा विचार असल्याचे भाऊसाहेबांनी यावेळी बोलून दाखविले.