पटकथा तीच, नायक नवा - उद्धव ठाकरेंचे भाजपावर टीकास्त्र
By Admin | Updated: February 23, 2015 09:45 IST2015-02-23T09:37:57+5:302015-02-23T09:45:05+5:30
नरेंद्र दाभोलकर प्रकरणात झाले तेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रकरणातही घडले. राज्यात 'नायक' नवा असला तरी 'पटकथा' जुनीच आहे असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर सोडले आहे.
पटकथा तीच, नायक नवा - उद्धव ठाकरेंचे भाजपावर टीकास्त्र
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - शिवसेना व भाजपामधील धुसफूस सुरुच असून सोमवारी उद्धव ठाकरेंनी सामनामधून राज्यातील सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात झाले तेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रकरणातही घडले. राज्यात 'नायक' नवा असला तरी 'पटकथा' जुनीच आहे असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपामध्ये 'सामना' सुरु असून उद्धव ठाकरे मुखपत्रातून भाजपावर वारंवार टीका करत आहेत. सोमवारीही उद्धव ठाकरेंनी नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येवरुन गृहखात्याची जबाबदारी असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पानसरे यांचे मारेकरी पकडण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनीही हेच आश्वासन दिले होते. दुर्दैवी बाब म्हणजे दाभोलकरांचे मारेकरी १८ महिन्यानंतरही मोकाटच आहेत. तर पानसरेंचे मारेकरीही पकडले गेलेेले नाही असे उद्धव ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले.
पोलिसांनी ताकद लावली तर मारेकरी सापडतील असे मुख्यमंत्री म्हणतात. गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असून असे विधान करुन फडणवीस पोलिसांवर अविश्वास दाखवत आहे. मारेक-यांनी व्यवस्थेला आव्हान दिले असेल तर मुख्यमंत्र्यांनी आधी राज्यातील व्यवस्था बदलावी. दुस-यांवर खापर फोडण्याऐवजी याविषयावर मंत्रिमंडळात चर्चा करावी असा सल्लाही ठाकरेंनी दिला. आत्मचिंतन करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आता कृती करावी असेही त्यांनी म्हटले आहे.